वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो याने आपला साथीदार आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला पाठिंबा दिला आहे. यावर्षी गेल उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसून आला नाही. त्यानंतर त्याच्या राष्ट्रीय संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेलने नुकतेच श्रीलंकाविरुद्ध दोन वर्षांनंतर राष्ट्रीय टी20 संघात पुनरागमन केले आहे. त्यानंतर त्याने 9 सामन्यात केवळ 12.75 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिल्या 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या गेलने फक्त 4 आणि 13 अशा धावा काढल्या होत्या. या टी20 सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने अनुक्रमे 18 आणि 56 धावांनी विजय मिळविला होता. मात्र तिसऱ्या टी20 सामन्यात ताबडतोब अर्धशतक करत त्याने टिकाकारांची बोलती बंद केली आहे.
गेलचे संघात असणे संघासाठी फायद्याचे
गेलला पाठिंबा देताना ब्रावो म्हणाला की, “गेल संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो यावर्षीच्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघातील महत्त्वाच्या सदस्यांपैकी एक आहे. त्याची केवळ संघातील उपस्थितीच विरोधी संघात भीती निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे. गेलमुळे आमच्या ड्रेसिंग रूममध्येही खूप शांतता असते. बाहेरून त्याच्या वयाचा पैलू लक्षात घेता त्याच्यावर खूप दबाव टाकला जात आहे. परंतु ड्रेसिंग रूममध्ये त्याच्यावर कोणताही दबाव नसतो.”
ब्रावो पुढे म्हणाला की, “गेलने वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी जे केले त्याचे आम्हाला खूप कौतुक आहे. तो एक लेजेंड आहे आणि आम्हाला शेवटचे काही महिने त्याच्याबरोबर आनंदाने घालवायचे आहेत. गेल त्याच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि आम्हाला गेलला अजून चांगली कामगिरी करताना पाहायचे आहे. तो आता अगोदर सारखा आक्रमक पद्धतीने खेळत नाही. पण आम्हाला त्याच्या धावा न करण्याची चिंता नाही.”
ख्रिस गेलची कामगिरी
ख्रिस गेल सर्वात छोट्या स्वरूपात घरगुती आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्याने नुकत्याच 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत. या दरम्यान गेलने आपल्या उत्कृष्ट फलंदाजाने 22 शतके आणि 87 अर्धशतके झळकावली आहेत. गेल आपल्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर आहे आणि वेस्ट इंडिजसाठी तो फक्त टी20 सामने खेळत आहे. असे असले तरीही, 41 वर्षीय गेल यावर्षीच्या टी20 विश्वचषकात वेस्ट इंडीजला विजेतेपद जिंकून देण्यात महत्वाची भूमिका निभावताना दिसेल. यावर्षी टी 20 विश्वचषकाचे आयोजन 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमान येथे केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम वर्क! हातून चेंडू निसटल्याने ब्रावोने पायाने मारली किक, मग काय सहकारी ऍलेनने टिपला झेल
बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत विंडीजची विजयाची हॅट्रिक, नायक पूरन-गेलने केले भन्नाट सेलिब्रेशन
गंभीरने निवडला भारताचा सर्वकानिल कसोटी संघ, धोनीला दिली जागा; पण ‘याला’ बनवले कर्णधार