भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी वनडे विश्वचषक स्पर्धा खेळताना दिसेल. ही स्पर्धा भारतातच होणार असल्याने भारतीय संघाकडे विजेतेपदाचा दावेदार म्हणून पाहिले जातेय. विश्वचषकासाठी भारतीय संघ कशाप्रकारे असेल, याबाबत आत्ताच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भारतीय संघात कोणाचा समावेश असावा याबाबत अनेक दिग्गज आपले मत व्यक्त करताना दिसतायेत. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही भारतीय संघात सलामीवीर कोण असावा याबाबत आपले मत दिले आहे.
पुढील वनडे विश्वचषक भारतात होत असल्याने भारत एक मजबूत संघ मैदानावर उतरवण्याचा प्रयत्न करेल. भारत रोहित शर्मा याच्याच नेतृत्वात हा विश्वचषक खेळण्याची शक्यता आहे. रोहित स्वतः सलामीवीर असल्याने दुसरा सलामीवीर कोण याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. केएल राहुल, शुबमन गिल, शिखर धवन व ईशान किशन असे अनेक पर्याय सध्या खुले आहेत. आता याच मुद्द्यावर ब्रेट ली याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ली म्हणाला,
“भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी ईशान किशन याने आपली दावेदारी ठोकली आहे. तो फॉर्ममध्ये राहिला, तंदुरुस्त राहिला आणि पुढील सहा महिने संघाच्या आसपास जरी राहिला, तरी त्यालाच पहिली संधी देण्यात यावी. माझ्यासाठी तो दोन सलामीवीरांपैकी एक असेल.”
ईशान किशन हा भारताच्या संघाचा नियमित सदस्य प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्यास त्याला संधी मिळते. मात्र, नुकतेच बांगलादेश दौऱ्यावर त्याने मिळालेल्या एकाच वनडे सामन्यात तुफानी द्विशतक साजरे केले. त्यानंतर त्याला संघात नियमित करावे असे बोलले जात आहे. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे शिखर धवन व शुबमन गिल यांच्यावरील दबाव आणखी वाढला आहे.
(Brett Lee Said Ishan Kishan Is Indias Opener In Next Year ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह कार्यक्रमात गेलचा अनिल कुंबळेंवर आयपीएल कारकीर्द संपवल्याचा आरोप; म्हणाला…
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रोहित-राहुलचा पत्ता कट? कारणही घ्या जाणून