वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याने आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आणि गोलंदाजांची नुकतीच निवड केली. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने ५ सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाज निवडले आहेत. या यादीत भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचादेखील समावेश आहे.
विंडीजचा माजी डावखुरा फलंदाज ब्रायन लाराने विराट कोहलीसह इतर ४ फलंदाजही आजच्या काळातील सर्वोत्तम ५ फलंदाज म्हणून निवडले आहेत. यात न्यूझीलंडचा केन विलियम्सन, इंग्लंडचा जो रूट, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ यांचाही समावेश आहे.
त्याचबरोबर गोलंदाजांच्या यादीत बुमराहसह इंग्लंडचा जोफ्रा आर्चर व जेम्स एँडरसन, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान यांचा समावेश केला आहे. मात्र, या यादीत लाराने कुठलीही क्रमवारी लावली नाही आहे.
लाराच्या काळात अनेक दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते. त्यामुळे आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंसह ब्रायन लाराने त्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंचीही नावे सांगितली आहेत. फलंदाजाच्या यादीत त्याने भारताचा सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाॅंटिंग, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि श्रीलंकेचा कुमार संगाकारा या दिग्गज फलंदाजांना स्थान दिले आहे.
यासह गोलंदाजांमध्ये लाराने पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूस, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न, श्रीलंकेचा मनगटी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा यांचा समावेश केला आहे.
लाराला मानले जाते सार्वकालीन महान फलंदाज
वेस्ट इंडिजचा माजी डावखुरा फलंदाज ब्रायन लारा त्याच्या काळातीलच नव्हे, तर क्रिकेटच्या इतिहासातील सार्वकालीन महान फलंदाज म्हणून ओळखला जातो. शैलीदार आणि आकर्षक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गज क्रिकेटपटूच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत लाराने कसोटीत १३१ सामने खेळताना ५२.८८ च्या सरासरीने ११९५३ धावा केल्या आहेत. सोबतच २९९ वनडेत ४०.४८ च्या सरासरीने त्याने १०४०५ धावा काढल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने काढलेली नाबाद ४०० ही आजही आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; ‘हा’ खेळाडू टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता
“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”
‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी
ट्रेंडिंग लेख-
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण