अलीकडेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला गेला. ज्यामध्ये न्यूझीलंडचा संघ विजयी झाला आहे. परंतु, दोन्ही संघांनी आपला संघ विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केला होता. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपापल्या संघांना विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.
सध्या अनेक संघ आपल्या कसोटी आणि मर्यादीत षटकांच्या संघांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमत आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका अशा संघांची यासाठी उदाहरणे देता येतील. तर भारत, न्यूझीलंड सारखे काही संघ आहेत, ज्यांचा सर्व क्रिकेट प्रकारासाठी एकच कर्णधार आहे.
या लेखात आपण एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल ८ संघांच्या कर्णधार, उपकर्णधारांबद्दल जाणून घेऊ.
वेस्ट इंडीज (किरोन पोलार्ड आणि शाई होप)
सत्तरच्या दशकातील एक मजबूत संघ म्हणून ओळखलेल्या गेलेल्या वेस्ट इंडीज संघांची कामगिरी २०१०च्या दशकानंतर मात्र खालावत गेली. तरी या संघामध्ये अजूनही स्फोटक आणि उत्कृष्ट खेळाडूंची कमतरता नाही. १९७३ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळणारा वेस्ट इंडीज संघ आतापर्यंत २९ कर्णधारांच्या नेतृत्वात ८२८ एकदिवसीय सामने खेळला आहे.
सध्या वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धूरा किरॉन पोलार्डच्या हातात आहे. त्याने १७ पैकी ११ सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. तर ८० एकदिवसीय सामन्यांमध्ये १० शतके आणि १९ अर्धशतकांचा अनुभव असणारा शाय होप संघाचा उपकर्णधार आहे.
दक्षिण आफ्रिका (टेंबा बावुमा आणि हेनरिक क्लासेन)
दक्षिण आफ्रिका सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी -20 मालिका खेळत आहे. आतापर्यंत या संघाने १६ कर्णधारांच्या नेतृत्वाखाली ६२८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या टेंबा बावुमाच्या नेतृत्वात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली कामगिरी दाखवत आहे.
बावुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाने आत्तापर्यंत केवळ ३ सामने खेळले आहेत आणि एक जिंकला आहे. त्याचबरोबर २० एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेला हेनरिक क्लासेन त्याच्याबरोबर उपकर्णधार म्हणून आहे. हेनरिकनेही पाकिस्तानविरूद्ध कर्णधारपद भूषवले आहे.
इंग्लंड (ओएन मॉर्गन आणि जोस बटलर)
इंग्लंड क्रिकेटचा जनक देश म्हणून ओळखला जातो. २०१९ क्रिकेट विश्वचषक विजेत्या इंग्लंडने १९७१ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यावर्षी रेमंड इलिंगवर्थच्या नेतृत्वात त्यांनी तीन सामने खेळले. त्यानंतर आतापर्यंत या संघाने ३३ कर्णधारांच्या नेतृत्वात एकूण ७५५ सामने खेळले आहेत.
सध्या ओएन मॉर्गन संघाचे नेतृत्व करीत असून या संघाने त्याच्या नेतृत्वाखाली १२४ एकदिवसीय सामन्यांपैकी ७४ सामन्यांमध्ये विजय मिळविले आहेत. तसेच, या संघाचे उपकर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरकडे आहे. यावर्षाच्या सुरुवातील भारताविरुध् झालेल्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत बटलरने दुखापतग्रस्त मॉर्गन ऐवजी इंग्लंड संघाचे नेतृत्वही केले होते.
पाकिस्तान (बाबर आजम आणि शादाब खान )
पाकिस्तानने आतापर्यंत एकूण ९३५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. पाकिस्तान संघाने इन्तिखाब आलम यांच्या नेतृत्वात पहिला एकदिवसीय सामना १९७३मध्ये खेळला होता. पाकिस्तान संघाने आतापर्यंत एकूण ३० कर्णधारांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय क्रिकेट खेळले आहे.
सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये या संघाच्या नेतृत्वाची धूरा आपला सर्वोत्कृष्ट फलंदाज असलेल्या बाबर आजमच्या खांद्यावर आहे. ८२ एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर १३ शतके आणि २० अर्धशतके आहेत. त्याच्या नेतृत्वात संघाने ८ पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्याला सहाय्य करण्याची उपकर्णधारपदाची जबाबदारी शदाब खानवर आहे, ४७ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असणारा शादाब गोलंदाजी अष्टपैलू आहे.
न्यूजीलंड (केन विलियम्सन आणि टॉम लॅथम)
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे. इतकेच नव्हे तर दोन वर्षांपूर्वी एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामनाही या संघाने खेळला होता. सध्या या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी केन विलियम्सनच्या खांद्यावर आहे.
त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघाने आतापर्यंत ७७ पैकी ४१ सामने जिंकले आहेत. तसेच न्यूझीलंड संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी टॉम लॅथमच्या खांद्यावर आहे. त्याच्या नावावरही १३ सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याचा आणि ११ विजय मिळवण्याची नोंद आहे.
ऑस्ट्रेलिया (ऍरोन फिंच आणि पॅट कमिन्स )
साल १९७१ मध्ये विल्यम लोरी यांच्या नेतृत्वाखाली पहिला एकदिवसीय सामना खेळणारा आणि जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ हा जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान संघ मानला जातो. एक वेळ असा होता की जेव्हा इतर संघ या संघाला पराभूत करण्यात त्यांचे भाग्य मानत असत. ऑस्ट्रेलिया संघाने बर्याच वेळा क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना खेळला आहे आणि ५ वेळा विजेतेपदही जिंकले आहे.
ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत २५ कर्णधारांच्या नेतृत्वात ९५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धूरा सध्या ऍरोन फिंचच्या ताब्यात आहे. ज्याने ४१ पैकी २३ सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. इतकेच नाही तर १३२ एकदिवसीय सामन्यात १७ शतके आणि २९ अर्धशतकांचा अनुभव त्याच्याकडे आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १११ बळी घेणारा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे.
भारत (विराट कोहली आणि रोहित शर्मा)
जागतिक क्रिकेटमध्ये सध्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणणा होणारे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार आहेत. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. आत्तापर्यंत भारताने ९९३ एकदिवसीय सामने खेळले असून या संघाला आत्तापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये २४ कर्णधार लाभले आहेत.
सध्या या संघाच्या नेतृत्वाची धूका विराट कोहली वाहत असून त्याला उपकर्णधार म्हणून रोहित शर्माची साथ मिळत आहे. विराटच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत भारताने ९५ एकदिवसीय सामने खेळले असून ६५ सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने १० एकदिवसीय सामन्यात भारताचे कर्णधारपद सांभाळले असून ८ सामन्यांत विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आपण २०३० विश्वचषक आयोजित करण्याच्या पात्रतेचे आहोत का?’ केविन पीटरसनचा संतप्त सवाल
युरो कपनंतर न्यूझीलंडचा क्रिकेटपटूंना आली २०१९ विश्वचषकाची आठवण, इंग्लंड संघाला केले ट्रोल
ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट केल्यास भारतीय खेळाडू होणार कोट्यधीश, महाराष्ट्र सरकार देणार इतके बक्षीस