नागपूर। मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या नागपूर टप्प्यातील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंटर पॉईंट स्कूल आणि श्री राजेंद्र हायस्कूल संघ यांच्यात जेतेपदाचा सामना होईल. विजयी संघाला मुंबईत होणाऱ्या प्ले ऑफचे तिकीट मिळेल.
शनिवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत सेंटर पॉईंट स्कूल ( दभा ) आणि सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड ) यांच्यात कडवी टक्कर अनुभवायला मिळाली. आदित्य भार्गवच्या अचूक माऱ्याने सेंटर पॉईंट स्कूल ( दभा) संघाला विजय मिळवून दिला. सेंटर पॉईंट स्कूल ( दभा ) संघाला प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांत ९ बाद १९२ धावाच करता आल्या. अराफ खानने नाबाद ४३, तर गगनप्रीत सैनीने ३८ धावांचे योगदान दिले.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड ) संघाचा डाव ३४.३ षटकांत १५६ धावांत गडगडला. आदित्य भार्गवने ४ विकेट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. सेंटर पॉईंट स्कूल ( दभा) संघाने हा सामना ३६ धावांनी जिंकला.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीत भवन्स बीपी विद्यामंदिर संघाला प्रथम फलंदाजी करताना ३७ षटकांत ११५ धावा करता आल्या. यश गुप्ताने ३ विकेट्स घेत भवन्स बीपी विद्यामंदिर संघाला धक्के दिले. श्री राजेंद्र हायस्कूल संघाने हे माफक लक्ष्य एकही फलंदाज न गमावता पार केले. श्री राजेंद्र हायस्कूलने १५.४ षटकांत ११८ धावा केल्या. आर्यन मुडेने नाबाद ६२ धावा केल्या. तीन विकेट्स घेणाऱ्या यश गुप्ताने ४८ चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक।
१४ वर्षांखालील मुले ( उपांत्य फेरी)।
सेंटर पॉईंट स्कूल ( दभा) ४० षटकांत ९ बाद १९२ ( अराफ खान ४३*, गगनप्रीत सैनी ३८) वि. वि. सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड) ३४.३ षटकांत सर्वबाद १५६ धावा, ३६ धावांनी विजयी; सामनावीर – आदित्य भार्गव ( ४ विकेट्स)