मुंबई । हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यांमधून एक सुखद बातमी आहे. लॉकडाऊनचा सदुपयोग करत येथील युवकांनी क्रिकेटचे मैदान तयार केले आहे. नदीजवळ असलेल्या जागेवर युवकांनी जीव तोडून मेहनत करत एक स्टेडियम उभा केले आहे. चंबा जिल्ह्यातल्या सलूनी तालुक्यातल्या युथ क्लब जंद्रेडाच्या सदस्यांनी हे मैदान उभे केले आहे.
यूथ क्लब जंद्रेड़ाचे प्रमुख अजय ठाकुर म्हणाले की, “एप्रिल महिन्यामध्ये लॉकडाउन लागू झाला तेव्हा क्लबच्या सर्व सदस्यांचे कामकाज ठप्प होते. कामकाज नसल्याने ते घरीच होते. या वेळेचा सदुपयोग क्रिकेट खेळण्यासाठी मैदान करावे, असे विचार त्यांच्या डोक्यात आले आणि त्यांनी श्रमदान करून हे मैदान साकारले.”
व्यवसायाने वकील असलेले अजय म्हणाले की, “सर्वप्रथम येथील सर्व काटेरी झाडी-झुडपे तोडून काढली आणि त्यानंतर मैदानाचा प्लॅन तयार केला. हे मैदान आंतरराष्ट्रीय मैदानासारखे बनवले आहे. खेळपट्टीपासून बाऊंड्री जवळपास साठ मीटर दूर आहे.”
या कामासाठी नगरसेवक हंसराज उपाध्यक्ष, क्लबचे उपाध्यक्ष बिपीन ठाकुर, सचिव पंकज पाठक ,सुरेंद्र ठाकूर यांनी विशेष मदत केली. जेसीबी अमित, सचिन ठाकुर, सुमित ठाकुर, विनय कुमार, रमन राजपूत, रोहित ठाकुर, आकाश, नीरज रवि ठाकुर आणि सूरजने श्रम दान केले. ग्राऊंडमध्ये खेळपट्टी बनवण्याचे काम सुरू आहे. जवळपास सहाशे ट्रक भरून येथून कचरा काढण्यात आला.
“हे मैदान बनविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मदत देण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य हिमलो देवी यांनी तीन लाख रुपयांची मदत देखील दिली. मैदान अधिक सुसज्ज करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक मदत करावी,” अशी मागणी देखील अजय ठाकूर यांनी केली आहे.