चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्याने काल (१९ सप्टेंबर) आयपीएल २०२०ची सुरुवात झाली आहे. अबु धाबी येथे पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबईने २० षटकात ९ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या आणि चेन्नईला १६३ धावांचे लक्ष्य दिले. यात मुंबईच्या सौरभ तिवारीच्या ४२ धावांच्या दमदार खेळीचा समावेश होता.
चेन्नईने मुंबईच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना तेवढी चांगली सुरुवात केली नाही. पहिल्या २ षटकातच त्यांनी शेन वॉटसन आणि मुरली विजयची विकेट गमावली. पण पुढे अंबाती रायडू आणि फाफ डू प्लेसिसने संघाचा डाव सांभाळला. रायडूने अफलातून ७१ धावा आणि डू प्लेसिसने नाबाद ५८ धावांची खेळी करत संघाला १९.२ षटकातच ५ विकेट्सने विजय मिळवून दिला. एवढेच नव्हे तर, या विजयासह चेन्नईने एकाहून एक दमदार विक्रमांची नोंद आपल्या खात्यात केली आहे. Chennai Super Kings Team 9 Records Made In Yesterday Match
चला तर जाणून घेऊया त्या विक्रमांविषयी…
१) चेन्नई सुपर किंग्सचा हा मुंबई इंडियन्सविरुद्ध १३वा विजय होता. चेन्नई आणि मुंबई संघ आतापर्यंत एकूण २९ वेळा आमने-सामने आले होते. त्यात १२ वेळा चेन्नईने, तर १७ वेळा मुंबईने विजय मिळविला होता.
२) कालच्या सामन्यातील पराभव हा मुंबईचा युएईच्या मैदानावरील सलग ६वा पराभव होता. यापुर्वी २०१४ साली युएईमध्ये खेळल्या गेलेल्या ५ सामन्यात मुंबई पराभूत झाली होती.
३) चेन्नईचा फिरकीपटू पियूष चावलाने सामन्यातील पहिली विकेट चटकावत हरभजन सिंगच्या १५० विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. त्याने काल रोहित शर्माची विकेट घेत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील १५१ वी विकेट्स घेतल्या. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर लसिथ मलिंगा (१७०) पहिल्या आणि अमित मिश्रा (१५७) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
४) कालच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या चेन्नईच्या अंबाती रायडूने ४८ चेंडूत ७१ धावांची अफलातून खेळी केली होती. हे त्याचे आयपीएलमधील १९वे अर्धशतक होते.
५) यापुर्वी चेन्नई विरुद्ध मुंबई संघात झालेल्या शेवटच्या ५ आयपीएल सामन्यात, चेन्नई पराभूत होत आली आहे. मात्र, कालच्या सामन्यात विजय मिळवत चेन्नईने ही पराभवाची मालिका खंडीत केली आहे.
६) कालच्या सामन्यातील मुंबईचा पराभव हा त्यांचा २०१३ पासून आयपीएलमधील पहिल्या सामन्यातील सलग ८वा पराभव होता.
७) एमएस धोनीने यष्टीमागे कायरन पोलार्ड आणि क्रुणाल पंड्याला झेलबाद करत, आपल्या टी२० क्रिकेटमधील यष्टीमागील २५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह तो टी२० क्रिकेटच्या इतिहासात यष्टीमागे २५० विकेट्स चटकावणारा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.
८) कालच्या सामन्यातील विजय हा एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाचा १००वा विजय होता.
९) पियूष चावला आतापर्यंत किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला आहे. त्याने या तिन्ही संघांकडून खेळताना आपली पहिली विकेट मुंबई इंडियन्सविरुद्ध घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सची गेल्या ७ वर्षांची परंपरा कायम; यावर्षीही…
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार
कोण होणार आयपीएलमधला सर्वात मोठा गेम चेंजर; भारतीय दिग्गजाने सांगितले नाव
ट्रेंडिंग लेख-
सौरभ तिवारी आणि मुंबई इंडियन्स ‘ये रिश्ता कुछ तो कहलाता है’
‘तो’ संघ जो आयपीएलची सुरुवात होण्याआधीच बनतो अंतिम सामन्याचा दावेदार!