सध्याचा भारतीय संघ हा जगातील अव्वल क्रमांकाचा संघ आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात वर्चस्वपूर्ण खेळ करण्याची क्षमता भारतीय संघाकडे आहे. तिन्ही प्रकारांत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गेल्या तीन महिन्यात सगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून तावून सुलाखून निघत स्वतःला सिद्ध केले आहे.
याच कारणाने सध्याच्या जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे तर वनडे आणि टी२० क्रमवारीत दुसर्या स्थानी आहे. सातत्यपूर्ण प्रदर्शनाने भारताने हा टप्पा गाठला आहे. याच कारणामुळे वेस्ट इंडिजचे माजी महान खेळाडू आणि दोन वेळचे विश्वविजेते कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांनी भारतीय संघाचे भरभरून कौतुक केले आहे.
“सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम”
सध्याच्या भारतीय संघाने लॉईड यांना प्रभावित केले आहे. ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राशी बोलतांना त्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले. ते म्हणाले, “हा भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम संघ आहे कारण त्यांच्याकडे वैविध्य आहे. या संघातील खेळाडू अतिशय फिट आहेत आणि पूर्णतः व्यावसायिक देखील आहेत.”
नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल ते म्हणाले, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाने पिछाडीवर पडल्यावर जे पुनरागमन केले, ते कमालीचे होते. त्या वेळी केलेल्या प्रदर्शनाने आपण नक्कीच म्हणू शकतो की हा आजवरचा सर्वोत्कृष्ट भारतीय संघ आहे.”
बुमराहचे देखील केले कौतुक
यावेळी लॉईड यांनी भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे देखील कौतुक केले. “बुमराह आपल्या खेळाबाबत सतत विचार करत असतो, आणि तो तुम्हाला कधीही आश्चर्यचकित करू शकतो. तो घातक बाऊन्सर देखील टाकू शकतो, आणि चेंडू उत्तम प्रकारे स्विंग देखील करू शकतो. ज्यावेळी संघ कठीण परिस्थितीत असतो, त्यावेळी तो विकेट काढून देतो. याच कारणाने तो एक स्पेशल गोलंदाज आहे”, अशा शब्दांत लॉईड यांनी बुमराहची पाठ थोपटली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी नेहमी लॉजिकली ऑन द स्टम्प बॉलिंग करतो’; देवेंद्र फडणवीसांची क्रिकेटच्या भाषेत राजकीय फटकेबाजी
चाहत्यांचे प्रेम पाहून वनडे मालिकेतून बाहेर गेलेला श्रेयस अय्यर झाला भावनिक, म्हणाला…
टीम इंडिया पार्टीत व्यस्त तर केएल राहुल बाळाला…, भारतीय दिग्गजाने ‘अशी’ घेतली मजा