पुणे । राजेश वाधवान समुह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीगमधील एक प्रमुख संघ एफसी पुणे सिटी हा पुन्हा एकदा नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे.
खेळाडूंबरोबर चाहत्यांचेही आवडते असलेल्या मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी पुणे सिटी संघ सुपर कप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सिध्द झाला आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने एफसी पुणे सिटी संघाचे सराव सत्र आज पुण्यात पार पडले. अत्यंत कसून सराव घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोपोविच म्हणाले की, ही स्पर्धा आमच्यासाठी इतर स्पर्धांसारखीच एक आहे.
आयएसएल स्पर्धेसाठी आम्ही ज्याप्रकारे खडतर परिश्रम केले होते. त्याच धर्तीवर या नव्या स्पर्धेसाठीही आणि खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत.
या नव्या आव्हानासाठी केवळ शारिरीक दृष्ट्या तंदरूस्तीबाबत तयारी करणे पुरेसे ठरणार नाही, असे सांगून पोपोविच म्हणाले की, आयएसएलच्या मौसमानंतर एका विश्रांतीनंतर हे खेळाडू परतले असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मानसिक दृष्ट्या तयारी करावी लागेल.
कारण या स्पर्धेसाठी आयएसएल स्पर्धेतीलच नव्हे तर आयलीग स्पर्धेतील संघही सुपर कप जिंकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आम्हांला 100टक्के योगदान देणे महत्वाचे आहे.
पात्रता फेरीतील सामन्यांचा दर्जा पाहून आपण अत्यंत प्रभावित झालो आहोत असे सांगून पोपोविच म्हणाले की, नजीकच्या भविष्यात भारतीय फुटबॉलचा विकास या स्पर्धेमुळे निश्चित होणार आहे.
पण तरीही प्रत्येक स्पर्धा ही आमच्यासाठी सारखीच असते. मग ती आयएसएल असो, किंवा सुपर कप किंवा आयलीग स्पर्धा असो. मला माझे खेळाडू कोणत्याही आव्हानासाठी सज्ज हवे आहेत. तसेच, सर्वोच्च स्तरावर केवळ खेळण्यासाठी नव्हे तर विजय मिळविण्यासाठी त्यांची तयारी असली पाहिजे.
भारताकडून खेळणारा विशाल कैथ वगळता एफसी पुणे सिटी संघातील सर्व खेळाडूंसह पोपोविच यांनी 19 मार्च रोजी पुणे येथे संघाचा सराव सुरू केला आहे. मात्र, भुवनेश्वर येथे होणार्या या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू उपलब्ध राहतील.
आयएसएलचा संपूर्ण मौसम आमच्यासाठी संस्मरणीय ठरला असून आमच्या खेळाडूंना या स्पर्धेतून आपल्या गुणवत्तेची खरी कल्पना आली. मात्र, सर्वोच्च यशासाठी आणखी खडतर परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
सुपर कप स्पर्धेच्या पहिल्या सलामीच्या सामन्यात एफसी पुणे सिटी संघासमोर शिलॉंग लाजांग संघाशी 4 एप्रिल रोजी सामना होणार आहे.