ऐकावं ते नवलच! चक्क गाय मैदानात शिरल्याने रणजी सामन्यात आला व्यत्यय

क्रिकेटमध्ये अनेकदा पावसामुळे किंवा खराब हवामानामुळे व्यत्यय आलेला पाहण्यात येतो. किंवा अनेकदा कुत्रा, मधमाशा मैदानात आल्याने सामना थांबलेला अनेकांनी पाहिला असेल. पण सध्या भारतात सुरु असलल्या रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यात चक्क गायी मैदानात आल्याने काहीवेळासाठी सामना थांबवावा लागला.

झाले असे की 20 फेब्रुवारीपासून रणजी ट्रॉफीच्या 86 व्या हंगामाचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु झाले आहेत. या फेरीत आंध्र विरुद्ध सौराष्ट्र संघात ओंगोले येथे सीएसआर शर्मा कॉलेजच्या मैदानात सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल(22 फेब्रुवारी) खेळ सुरु असताना मध्येच काही गायी मैदानात घुसल्या.

या गायींनी थेट खेळपट्टीवरही धाव घेतली. त्यांना मैदानातून बाहेर हाकलण्यासाठी कर्मचारी त्यांच्या मागे धावत होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक झाली. या सर्वप्रकरणामुळे काही वेळासाठी सामनाही थांबवण्यात आला. अखेर त्या गायी मैदानातून बाहेर गेल्यानंतर सामना सुरु झाला.

विशेष म्हणजे याच रणजी हंगामात 2 वेळा साप मैदानात आले होते. तसेच 2 वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीच्याच दिल्लीत झालेल्या एका सामन्यात एका व्यक्तीने थेट कार मैदानात आणली होती. त्यामुळेही सामन्यात व्यत्यय आला होता. अशा अनेक विचित्र कारणांमुळे आजपर्यंत क्रिकेट सामन्यांमध्ये व्यत्यय आला आहे.

सौराष्ट्रचे सामन्यात वर्चस्व – 

आंध्र विरुद्ध सौराष्ट्र संघात सुरु असलेल्या उपांत्यपूर्व रणजी सामन्यात सौराष्ट्राने आज(23 फेब्रुवारी) 400 पेक्षाही अधिक धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात सौराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 419 धावा केल्या होत्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या आंध्रला पहिल्या डावात सर्वबाद 136 धावाच करता आल्या. त्यामुळे सौराष्ट्राने 283 धावांची भक्कम आघाडी घेतली. यानंतर सौराष्ट्राने आज दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे 400 पेक्षाही अधिक धावांची आघाडी आहे.

You might also like