दोन वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज…

पाकिस्तानमध्ये खूप वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात येत आहेत. नुकतेच बांगलादेश, श्रीलंकासारखे संघ आणि अनेक दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानचा दौरा केला आहे. त्यामुळे यावर्षी पाकिस्तानने पहिल्यांदाच पाकिस्तान सुपर लीगचे (PSL) पूर्ण आयोजन पाकिस्तानमध्ये केले आहे.

या लीगमध्ये पेशावर जालमी संघाचे नेतृत्व डॅरन सॅमी (Darren Sammy) करत आहे. तसेच सॅमी लवकरच पाकिस्तानचे नागरिकत्व स्विकारण्याचीही शक्यता आहे.

विंडीजला कर्णधार म्हणून 2 आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या सॅमीला आता पाकिस्तानचे नागरिकत्व पाहिजे आहे. त्यासाठी त्याने अर्जही केला आहे.

सॅमी सेंट लुसिया या कॅरेबियन बेटावरील क्रिकेटपटू बनणारा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. 

ज्या वेळी पीएसएलच्या दुसऱ्या मोसमात कोणताही खेळाडू अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानला जाण्यासाठी तयार नव्हता तेव्हा सॅमी पाकिस्तानला जाण्यासाठी तयार झाला होता. यावेळी सॅमीने आपल्या पेशावर जालमी संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर सॅमीला पाकिस्तानमध्ये मोठा चाहतावर्ग मिळाला आहे.

पेशावर जालमी संघाचे मालक जावेद आफ्रिदीने cricketpakistan.com.pk ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सॅमीने पाकिस्तानचे नागिरकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे.

“आम्ही सॅमीला मानद नागरिकत्व (Citizenship) देण्याचे आवाहन केले आहे. हा अर्ज सध्या राष्ट्रपतींकडे आहे. आम्ही पीसीबीच्या अध्यक्षांशी सॅमीला नागरिकत्व देण्यासाठी मदत करण्याबद्दल चर्चा केली आहे,” असे जावेद यावेळी म्हणाले.

सॅमी पीएसएलच्या 5व्या मोसमात भाग घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचला आहे. यावेळी सॅमी म्हणाला की, “हा हंगाम इतर हंगामापेक्षा चांगला असावा अशी माझी इच्छा आहे. एक खेळाडू आणि चाहता म्हणून आम्ही एकत्र मिळून जगाला हे दाखवून देऊ की, पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणे किती शानदार आहे.”

पाकिस्तानमध्ये आल्यानंतर सॅमी म्हणाला की, “पाकिस्तानला येऊन चांगले वाटत आहे. पाकिस्तानमध्ये पीएसएल खेळण्यासाठी मी खूप उत्साही आहे. मी यापूर्वी 2017 मध्ये अंतिम सामन्यासाठी येथे आलो होतो. आता मला आनंद होत आहे की, यावेळी संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये होत आहे.”

“मी यापूर्वीही म्हटले आहे की, मी माझ्या कारकीर्दीत मायदेशात आणि परदेशात सामने खेळले आहेत. मला माहिती आहे की, प्रत्येक देशाच्या चाहत्यांना आपल्या खेळाडूंना आपल्या देशात खेळताना पाहायचे असते.”

You might also like