चेन्नई सुपर किंग्स म्हटले की आता प्रत्येकाला पहिले समोर येतो तो यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी. चेन्नई सुपर किंग्स म्हणजे एमएस धोनी असे जणूकाही आजकाल समीकरणच झाले आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना मोठे यश मिळवले आहे. चेन्नई सुपर किंग्स सहभागी झालेल्या प्रत्येक आयपीएल मोसमात धोनी त्यांचा कर्णधार राहिला आहे आणि तोच या संघाची ओळखही ठरला आहे. त्यामुळेच त्याच्याशिवाय अनेकांना चेन्नई सुपर किंग्सचा विचार करणेही कठिण वाटते.
या धोनीला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या पहिल्या मोसमात 1.5 मिलियन डॉलर्सला खेळाडूंच्या लिलावात खरेदी केले होते. त्यावेळी तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण आत्ता असे सांगितले तर अनेकांना आश्चर्य वाटेल की चेन्नई सुपर किंग्सचे संघमालक एन श्रीनिवासन यांची पहिली पसंती धोनीला नव्हती.
याबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रचेखर यांनी एकदा स्पोर्ट्सकिडाशी बोलताना खुलासा केला होता. चंद्रशेखर 2008 च्या आयपीएलवेळी चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य निवडकर्ता होते. तसेच त्यांचे क्रिकेट संचालक होते.
चंद्रशेखर यांनी सांगितले होते, ‘2008 च्या आयपीएल लिलावाआधी एन श्रीनिवासन यांनी मला विचारले होते, ‘तू कोणाला घेणार आहेस?’ मी म्हणालो होतो, धोनी. त्यानंतर त्यांनी विचारले, ‘विरेंद्र सेहवागला का नाही?’
पुढे चंद्रशेखर म्हणाले, ‘मी म्हणालो, सेहवाग प्रेक्षकांना भविष्यात हवी असणारी प्रेरणा देणार नाही. पण धोनी कर्णधार, यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे, जो त्याच्या जोरावर सामन्याची परिस्थिती बदलू शकतो. म्हणून मी त्यांना विचारले की आपण त्याला घ्यायला पाहिजे का?’
चंद्रशेखरने सांगितले की श्रीनिवासन यांनी नंतर आपला विचार बदलला आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी आले आणि म्हणाले की धोनीला घ्या. पण त्यावेळी चंद्रशेखर यांना भीती होती की त्यांच्यापेक्षा इतर फ्रँचायझी अधिक खर्च करून धोनीला संघात सामील करुन घेतील.
पुढे चंद्रशेखर यांनी सांगितले होते की ‘त्यामुळे मी लिलावाचा विचार केल्यानंतर माझी रक्कम 1.4 मिलियन डॉलर्स इतकी वाढवली आणि त्यानंतर संघ घेण्याचा प्रयत्न केला. कारण आमच्याकडे संपूर्ण संघासाठी फक्त पाच मिलियन डॉलर्स होते. त्यातील 1.4 मिलियन एकट्या धोनीसाठी होते.’
‘पण जसेजसे लिलाव जवळ आला तेव्हा कोणीतरी म्हणाले की धोनीवर 1.8 मिलियन डॉलर्सपर्यंत बोली लागू शकते. म्हणून मी त्यावेळी सांगितले की जर धोनी 1.5 मिलियन डॉलर्सच्यावर गेला तर मी त्याला जाऊ देईन कारण आम्हाला एक संघ बनवायचा होता.’
त्यानंतंर अखेर चेन्नई सुपर किंग्सने धोनीला 1.5 मिलियन डॉलर्सला खरेदी केले. तेव्हापासून धोनी चेन्नई सुपर किंग्सचा आयकॉन बनला आहे. पहिल्याच मोसमात त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ अंतिम सामन्यातही पोहचला होता. पण त्यांना अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभव स्विकारावा लागला. त्याच्या नेतृत्वाखाली पुढे चेन्नईने 2010, 2011, 2018 ला आयपीएलचे विजेतेपद मिळवले. तसेच चेन्नईला त्याने 8 वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचवले आहे.