क्रिकेट जगतात आतापर्यंत एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू पहायला मिळाले आहेत. तसं बऱ्याच खेळाडूंमध्ये प्रतिभा असतेच, परंतु त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम एक कर्णधार चांगल्याप्रकारे करू शकतो. अशाच प्रकारे भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आपल्या काळात भारतीय संघातील अनेक खेळाडूंच्या कारकीर्दीला योग्य दिशा दिली. त्या कर्णधारांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश होतो.
एक काळ होता, जेव्हा २००० नंतर भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळल्यानंतर सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) अनेक युवा खेळाडूंची कारकीर्द घडविण्यात खास योगदान दिले होते. त्यामध्ये विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), हरभजन सिंग (Harbhajan Singh), झहीर खान (Zaheer Khan) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) या खेळाडूंंचा समावेश आहे.
नंतर धोनीने (MS Dhoni) भारतासाठी जवळपास १० वर्षे नेतृत्व केले आहे. या दरम्यान त्यानेदेखील अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवली आहे. त्यामुळे ते क्रिकेटपटू आजही धोनीला धन्यवाद देतात.
या लेखात आपण त्या ५ खेळाडूंची माहिती घेणार आहोत, जे धोनीमुळे संघात स्थिरावले.
धोनीचा पाठिंबा मिळालेले ५ खेळाडू- Five Player who get support from MS Dhoni
५. आर अश्विन
भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर. अश्विन (R Ashwin) आज संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. अश्विनची कसोटी कारकीर्द सातत्याने यशाच्या मार्गावर आहे. अश्विनची आयपीएलमधील प्रतिभा पाहिल्यानंतर त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती.
आयपीएल २०१० मध्ये अश्विन धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. त्यानंतर त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तसेच त्याने २०११मध्ये भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते. अश्विनने धोनीच्या नेतृत्वात आपली कारकीर्द घडवली. अश्विनच्या कारकीर्दीत धोनीचे मोलाचे योगदान राहिले. तो नेहमी अश्विनला पाठिंबा देत होता.
४. रविंद्र जडेजा
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) गणना आज जगातील काही सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. जडेजाने भारतीय संघात चमकदार कामगिरी करत तिन्ही क्रिकेट प्रकारात खास स्थान मिळविले आहे. जडेजाला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून चांगली कामगिरी करताना पाहिले होते, त्यानंतर त्याला २००९मध्ये भारतीय संघात सामील करण्यात आले होते.
जडेजाने धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला तिन्ही क्रिकेट प्रकारात संघात सामील करण्यात आले आणि धोनीच्या नेतृत्वात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. तसं जडेजाच्या कारकीर्दीत अनेक चढ-उतार आले, परंतु धोनीने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आणि तो आज भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून खेळत आहे.
३. विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आज जे स्थान मिळविले आहे, ते प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. परंतु असे स्थान खूप कमी लोक मिळते. विराट सध्याच्या काळातील जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. विराटने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि सातत्याने यशाची पायरी चढत आहे.
विराट आज तिन्ही क्रिकेट प्रकारातील दिग्गज खेळाडू आहे. तसं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट सुरुवातीपासूनच धडाकेबाज आहे. परंतु कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये काही खास कामगिरी करू शकला नव्हता. परंतु धोनीने आपल्या नेतृत्वाखाली त्याला पाठिंबा दिला आणि विराटला सतत संधी देत राहिला. आज कसोटीत त्याने मिळवलेले स्थान उल्लेखनीय आहे.
२. रोहित शर्मा
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आज जागतिक दर्जाचा फलंदाज बनला आहे. रोहित ज्याप्रकारे मागील काही वर्षांमध्ये कामगिरी करत आहे, ते पाहून सर्वजण भारावून गेले आहेत. ‘हिटमॅन’ नावाने प्रसिद्ध असलेला रोहित वनडे आणि टी२० क्रिकेटचा बादशाह बनला आहे.
रोहितने आपल्या कारकीर्दीची सुरुवात २००७च्या टी२० विश्वचषकातून केली होती. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान पक्के करण्यास काही वर्षे गेली. परंतु धोनीने रोहितवर विश्वास ठेवला आणि २०१३मध्ये त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली. त्यानंतर रोहितची कारकीर्द घडली. आज तो कोणत्या स्थानावर आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही.
१. सुरेश रैना
भारतीय संघात काही वर्षांपूर्वी मधल्या फळीतील विश्वासू खेळाडू म्हणून सुरेश रैनाचे (Suresh Raina) नाव घेतले जात होते. रैना जरी आज संघापासून दूर आहे, परंतु तरीही त्याने भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळताना जबरदस्त योगदान दिले होते. रैना कमालीचा फलंदाज आहे, जो अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे.
भारतीय संघाकडून खेळणाऱ्या रैनाला धोनीने आपल्या नेतृत्वाखाली जबरदस्त पाठिंबा दिला. आयपीएलमध्येही दोघांनीही एकत्र खेळल्यामुळे त्यांच्यात चांगले संबंध स्थापित झाले आहेत. धोनीने आपल्या नेतृत्वात रैनाला खूप पाठिंबा दिला आणि त्यामुळेच रैना दीर्घकाळ भारतीय संघाकडून खेळू शकला आहे.