आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी ताजी महिला वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने मंगळवारी(२८ सप्टेंबर) आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमधील पहिले स्थान गमावले आहे. ती आता तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. असे असले तरी भारतीय वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने मात्र, मोठी झेप घेतली आहे.
झुलनने गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेतील खराब प्रदर्शनामुळे मिताली राजला तिचे पहिले स्थान गमवावे लागले आहे. मितालीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यात २९ च्या सरासरीने ८७ धावा केल्या आहेत. क्रमवारीमध्ये तिच्याकडे ७३८ गुण आहेत.
दक्षिण अफ्रिकेची लिजेली ली ७६१ गुणांसह दुसऱ्या स्थानावरून फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारताविरुद्ध तीन सामन्यात ११२ धावा करणाऱ्या एलिसा हीली ७५० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारतीय फलंदाज स्मृती मंधाना एका स्थानाने वर जात सहाव्या स्थानावर पोहचली आहे. स्मृतीकडे ७१० गुण आहेत.
फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाची बेथ मूनीला आठ स्थानांचा फायदा झाला आहे आणि ती आठव्या स्थानावर पोहोचली आहे. तसेच मेग लेनिंग सातव्या स्थानावर आहे. मूनीने भारताविरुद्ध एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने ८९. ८४ च्या सरासरीने १७७ धावा केल्या.
गोलंदाजांच्या यादीत झूलन दुसऱ्या स्थानावर
ऑस्ट्रेलियविरुद्धच्या मालिकेत झूलन गोस्वामीने चार विकेट्स घेतले आहेत. तिने अखेरच्या सामन्यात ३७ धावा देत तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे ती दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या जेस योनासेन ७६० गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. भारताच्या झूलन ७२७ गुणासंह दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाची मेगन शट एका स्थानाच्या नुकसानाने ७१७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडची आन्या श्रबसोल आणि केट क्राॅस यांची जोडी ९ व्या आणि १० व्या स्थानासह पहिल्या १० मध्ये सामील झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम दोन एकदिवसीय सामन्यात तीन विकेट्स मिळणारी श्रबसोलला चार स्थानांचा फायदा झाला आहे. तसेच क्रॉसने पाचव्या एकदिवसीय सामन्यात ४४ धावा देत तीन विकेट्स मिळवल्या होत्या, तिला या यादीत पाच स्थानांचा फायदा झाला आहे.
???? pic.twitter.com/S62NgGPJ6L
— ICC (@ICC) September 28, 2021
झूलनला अष्टपैलूंच्या यादीतही फायदा
अष्टपैलूंच्या यादीतही झूलनने तीन स्थानांची उडी घेत १० वे स्थान गाठले आहे. तिच्याकडे २५१ गुण आहेत. ऍश गार्डनरला चार स्थानांचा फायदा झाला असून ती सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. एलिस पेरी तिच्या खराब फॉर्ममुळे दोन स्थानांनी खाली घसरली आणि तिसऱ्या स्थानावर आहे, यामुळे दक्षिण अफ्रिकेची मारिजेन कॅप पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारताची दिप्ति शर्मा एका स्थानाने खाली घसरत पाचव्या स्थानावर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विकेट गेल्याच्या संतापात अश्विनची गोलंदाज साऊथीशी बाचाबाची, मग पंत-मॉर्गनमध्येही जुंपली, अखेर…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेले तीन भारतीय दिग्गज, जे आयपीएलमध्ये ठरले फ्लॉप
वॉर्नरचे सनरायझर्स सोबतचे दिवस संपले का? खुद्द संघ प्रशिक्षकांनी दिले महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर