भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाला 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने सुरु होणार आहे. या दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. वनडे मालिका संपल्यानंतर टी20 मालिका होईल आणि नंतर कसोटी मालिका रंगणार आहे. या दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकांदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पा यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळू शकते. कारण झम्पाने आत्तापर्यंत विराटला नेहमीच त्रस्त केलं आहे.
ऍडम झम्पाने कोहलीला सर्वाधिक वेळा केले बाद
मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू ऍडम झम्पाने कोहलीला सर्वाधिक वेळा बाद केलं आहे. त्याने वनडेमध्ये विराटला सर्वाधिक 5 वेळा बाद केले आहे. झम्पाने विराटला 148 चेंडू फेकले असून त्याने 174 धावा दिल्या आहेत. या काळात त्याने विराटला 5 वेळा तंबूचा मार्ग दाखवला आहे.
भारत दौऱ्यावर दोन वेळा विराटला पाठवलं तंबूत
मागच्या वर्षी भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. त्यामध्ये दोन सामन्यांमध्ये झम्पाने विराटला बाद केले होते. त्याने टी20 मध्येही विराटला 2 वेळा बाद केले आहे.
झम्पाविरुद्ध विराटची कामगिरी उत्तम
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे झम्पाने जरी विराटला सर्वाधिकवेळा बाद केले असले तरी त्याच्याविरुद्ध विराटची कामगिरी चांगली राहिली आहे. झम्पाविरुद्ध विराटने 109.25 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याची सरासरीही 60 च्या वर आहे. तरी आता यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट झम्पाविरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच ऑस्ट्रेलिया देखील झम्पाचा विराट विरुद्ध कसा वापर करणार हे देखील पाहावे लागेल.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 27 नोव्हेंबरला खेळला जाईल. दुसरा वनडे सामना 29 नोव्हेंबरला असून तिसरा वनडे सामना 2 डिसेंबर रोजी होईल.
त्यानंतर तीन टी20 मालिकेचा पहिला सामना 4 डिसेंबरला होईल. दुसरा टी20 सामना 6 डिसेंबरला तर तिसरा टी20 सामना 8 डिसेंबरला होईल. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना 17 डिसेंबरपासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
सेहवाग करतोय पुनरागमन, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दिसणार ‘या’ भूमिकेत
‘लगान’ चित्रपटाचा फोटो शेअर करत माजी दिग्गजाने आर अश्विनला केले ट्रोल
“मी निराशेतून लवकर बाहेर येईल आणि…”, भारतीय संघात निवड न झाल्यामुळे सूर्यकुमारने रोहितशी केली चर्चा