मुंबई । भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती क्रिकेट फॅन्सला कमीच आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षी हे बालपणीचे दोस्त आहेत. लग्नापूर्वी दोन्ही परिवार एकमेकांच्या परिचयाचे होते असे प्रत्येकाला वाटत होते. नुकतेच साक्षीने त्यांच्या मैत्रीबाबत खुलासा केला आहे.
इन्स्टाग्रामवर चेन्नई सुपर किंग्स सोबत लाइव्ह बोलताना साक्षी म्हणाली, लोकांना असे वाटते की मी आणि महेंद्रसिंह धोनी बालपणीचे मित्र आहोत. आमचे कुटुंब देखील एकमेकांचे मित्र आहेत. पण आमच्या दोघांत सात वर्षांचे अंतर आहे आणि आम्ही बालपणीचे मित्र नाहीत. लग्नानंतर पहिल्यांदाच मी 7 जुलै 2010 साली रांचीला धोनीच्या वाढदिवसा दिवशी गेले होते. त्यापूर्वी 4 जुलै रोजी आमचे डेहराडून येथे लग्न झाले.
चेन्नई सुपरकिंग्स बद्दल बोलताना म्हणाले की, चेन्नई सुपरकिंग्सचे आयपीएलमधील पुनरागमन हा धोनीसाठी भावुक क्षण होता. म्हणून लीग सुरू होण्यापूर्वी डिनर पार्टीच्या वेळी धोनीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. चेन्नई सुपर किंग्सला फिक्सिंगच्या आरोपांमुळे 2016 साली दोन वर्षांसाठी प्रतिबंधित करण्यात आले होते. 2018 साली चेन्नई सुपर किंग्सने दमदार पुनरागमन करत किताब जिंकला.
झीवाच्या जन्मावेळी 2015 साली महेंद्रसिंग धोनी विश्वचषक स्पर्धेमुळे माझ्याजवळ नव्हता. मी माझ्या मुलीच्या जन्मावेळी पूर्णतः काळजी घेतली. अशा वेळी धोनी माझ्या जवळ असणे गरजेचे होते असे प्रत्येक जण म्हणत होते. पण धोनी नसल्याने काही फरक पडला नाही, असेही साक्षी म्हणाली.