मुंबई । जागतिक क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर-वीरेंद्र सेहवाग, मॅथ्यू हेडन-ॲडम गिलख्रिस्ट या खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत विरोधी संघाच्या गोलंदाजांवर आपला धाक निर्माण केला होता. यापैकी सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी सलामीला फलंदाजी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांचा रचले. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांचीही जोडी प्रसिद्ध होती.
क्रिकेटमधल्या या जोडीविषयी एका कार्यक्रमात बोलताना श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा म्हणाला, विराट कोहली आणि रोहित शर्मा वर्तमानकाळात भारतीय संघातील अशी जोडी आहे ज्याप्रमाणे नव्वदच्या दशकात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांची जोडी होती. विराट आणि रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 35 हजार 930 धावा केल्या आहेत.
प्रत्येक दशकात क्रिकेटमध्ये एकतरी जोडी छाप सोडत असते. विराट आणि रोहित या जोडीने देखील भारतीय संघाकडून खेळताना आपली छाप सोडली आहे. वास्तविक पाहता विराट आणि रोहितमध्ये खूप काही खास गोष्टी आहेत. हे बरोबर आहे की सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये नियम बदलल्याने धावा करणे सोपे केले आहे. तरीही या दोघांनी ज्या परिस्थितीमध्ये धावा केल्या आहेत त्याविषयी त्यांचा आदर केला पाहिजे.
रोहित आणि विराट दोघेही तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. प्रसंगानुरूप अनेक स्फोटक खेळी करुन विरोधी संघाला नेस्तनाबूत करायचे. त्यांच्या भात्यातून निघणारा फटका हा नजरेत भरणार आहे. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे देखील असेच फलंदाज होते. रोहित आणि विराट हे भारताचे सर्वोत्कृष्ट जोडी आहे यात वादच नाही.