क्रिकेटविश्वातून एकापाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतेच 4 सप्टेंबर रोजी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वडील बनला होता. आता त्याच्यानंतर आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचा विस्फोटक फलंदाज राहुल तेवतिया यानेही आनंदाची बातमी दिली आहे. राहुल तेवतिया वडील बनला आहे. त्याची पत्नी रिद्धीने मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) मुलीला जन्म दिला आहे. तेवतियाने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून दिली आहे. आता त्याच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राहुल तेवतिया इंस्टाग्राम पोस्ट
अष्टपैलू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या फोटोत तो त्याच्या मुलीचे पाय दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “आज आम्ही दोनपासून तीन झालो. आज हिचा जन्म झाला आणि ही खूपच सुंदर आणि गोड आहे.”
तेवतियाच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव
राहुल आणि रिद्धी यांचा फेब्रुवारी 2021मध्ये साखरपुडा झाला होता. यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2021मध्ये लग्नाची गाठ बांधली होती. आता वडील बनलेल्या तेवतियाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच भारतीय क्रिकेटपटूंनीही त्याचे अभिनंदन केले आहे. दिग्गज फिरकीपटू युझवेंद्र चहल याने हार्ट इमोजी कमेंट करत “अभिनंदन” असे लिहिले आहे. तसेच, रिषभ पंत यानेही कमेंट्समध्ये हार्ट इमोजीचा समावेश केला आहे. याव्यतिरिक्त अक्षर पटेल, मोहित शर्मा अभिनव मनोहर, विजय शंकर, शिवम दुबे या खेळाडूंनीही कमेंट्स करत अभिनंदन केले आहे.
आयपीएल 2023मधील कामगिरी आणि भारतीय संघात निवड
तेवतिया 30 वर्षांचा असून तो अखेरचा आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत खेळताना दिसला होता. मात्र, या हंगामात तो खास कामगिरी करू शकला नव्हता. त्याने 17 सामन्यात 21.75च्या सरासरीने 87 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, 2021मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी राष्ट्रीय संघात जागा मिळाली होती. मात्र, त्याचे पदार्पण होऊ शकले नव्हते. सन 2022मध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही त्याला संघात जागा मिळाली नव्हती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली होती. (cricketer rahul tewatia becomes father shares first picture social media)
हेही वाचाच-
‘सुपर-4च्या’ पहिल्या सामन्यात पाकिस्तान-बांगलादेश आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल माहिती
नाद करा पण श्रेयंकाचा कुठं! महिलांच्या CPL स्पर्धेत ‘अशी’ कामगिरी करताच बनली पहिली भारतीय, सर्वांना पछाडलं