इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरचा म्हणजेच 70वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. रविवारी (दि. 21 मे) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीला विजय मिळवणे खूपच गरजेचे होते. मात्र, शुबमन गिल याने अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर विजयी षटकार मारला आणि आरसीबी संघाच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना सुरंग लावला. सामन्यात पराभूत होऊनही आरसीबीचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीने शुबमन गिलला मिठी मारली. यादरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघावर भारी पडला. आरसीबी संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली (Virat Kohli) याने शानदार शतक झळकावले होते. मात्र, शुबमन गिल (Shubman Gill) याचे शतक विराटच्या शतकावरही भारी पडले. अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर गिलने जसा विजयी षटकार मारला, तसा आरसीबी संघाच्या प्ले-ऑफमध्ये जाण्याच्या आशांना सुरंग लावला. तसेच, मुंबई इंडियन्स संघाने प्ले-ऑफमध्ये जागा बनवली. त्यांचे 16 गुण होते.
यापूर्वी विराट कोहली याच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर आरसीबीने 5 विकेट्स गमावत 197 धावा केल्या होत्या. विराटव्यतिरिक्त फक्त कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यानेच सर्वाधिक 28 धावा केल्या. विराटचे हे आयपीएलमधील सातवे शतक होते. तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. या हंगामातील हे त्याचे सलग दुसरे शतक होते.
तसेच, गिलनेही गुजरात संघाची खिंड लढवताना विजयी झुंज दिली. त्यानेही आपले सलग दुसरे आयपीएल शतक झळकावले. त्याने 52 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची खेळी साकारली. गुजरात संघाने हा सामना 5 चेंडू शिल्लक ठेवत 6 विकेट्सने जिंकला.
विराटने गिलला मारली मिठी
गिलने अनेकदा सांगितले आहे की, तो विराट कोहली याला आदर्श मानतो. तसेच, दोघांमध्ये चांगले नाते आहे. हेच नाते त्यांचे सामन्यानंतरही पाहायला मिळाले. सामन्यानंतर आरसीबी प्ले-ऑफमधून बाहेर पडल्याचे दु:ख विसरत विराट कोहलीने शुबमन गिल याला त्याच्या शानदार शतकासाठी शुभेच्छा दिल्या. विराटने गिलला मिठी मारली आणि जबरदस्त खेळीचे कौतुकही केले.
Obviously as a sportsman Kohli sees the positive side of it and the scum that claim to be fans are abusing pic.twitter.com/DcJUMCud4R
— Gajala – CEO, Sonic Solutions (@Hramblings) May 21, 2023
Virat Kohli hugged and congratulated Shubman Gill.
The two centurions of the night – The King and the Prince! pic.twitter.com/acARvCvSe5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2023
सामन्यानंतर गिल म्हणाला की, त्याला चांगली सुरुवात मोठ्या खेळीत बदलायची होती. बरं झालं की, आयपीएल 2023च्या अखेरच्या महत्त्वाच्या टप्प्यात हे त्याच्यासाठी चांगले काम करत आहे.
पहिला क्वालिफायर सामना
आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना 23 मे रोजी एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडणार आहे. (cricketer virat kohli hugged shubman gill after hundred and gt beat rcb at bengaluru IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! आरसीबीच्या पराभवानंतर चाहत्यांनी सोडली पातळी, मॅचविनर गिल अन् त्याच्या बहिणीला केली शिवीगाळ
रोहितच्या आयपीएल कारकिर्दीवरील डाग पुसला! आता कार्तिकच्या नावे ‘तो’ नकोसा विक्रम