भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिल्या वनडे सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र, तरीही विराटने सामन्यात आपल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने वाहवा लुटली. विराटने असा झेल पकडला, ज्यामुळे भारताने सामना जिंकूनही सर्वत्र त्याच्या झेलाची चर्चा रंगली आहे. आता विराटचा हा झेल सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
विराटचा 18व्या षटकात कारनामा
झाले असे की, वेस्ट इंडिज संघाच्या डावातील 18वे षटक भारताकडून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) टाकत होता. जडेजाच्या गोलंदाजीवर स्ट्राईकवर रोवमन पॉवेल फलंदाजी करत होता. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पॉवेल शुबमन गिल याच्या हातून झेलबाद झाला. त्यानंतर स्ट्राईकवर रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) आला. तिसरा चेंडू त्याने निर्धाव खेळला. यानंतर चौथ्या चेंडूवर शेफर्डने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू वळला आणि बॅटची कड घेत स्लीपच्या दिशेने गेला. यावेळी विराट दुसऱ्या स्लीपमध्ये उभा होता. विराटने उजव्या बाजूला डाईव्ह मारत एका हाताने शानदार झेल टिपला. शेफर्डला यावर विश्वास बसला नाही. मात्र, त्याला एकही धाव न करता तंबूत परतावे लागले.
King Grab 🦀@imVkohli pulls off a stunner 😱#INDvWIonFanCode #WIvIND pic.twitter.com/ozvuxgFTlm
— FanCode (@FanCode) July 27, 2023
वेस्ट इंडिजचा डाव 114 धावांवर संपुष्टात
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकातच सर्व विकेट्स गमावत 114 धावा केल्या होत्या. यावेळी विंडीजकडून कर्णधार शाय होप (Shai Hope) चमकला. त्याने 45 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त ऍलिक अथानाजे (22) आणि सलामीवीर ब्रेंडन किंग (17) यांनीही दोन आकडी धावसंख्येचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, जडेजानेही कमालीची गोलंदाजी करत 3 विकेट्स नावावर केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.
आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 22.5 षटकात 5 विकेट्स गमावत 118 धावा करून विजय मिळवला. यावेळी भारताकडून ईशान किशन (52) याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. (cricketer virat kohli takes sensational one handed catch in ind vs wi 1st odi match)
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs WI : रोहित सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का उतरला? सामन्यानंतर डिटेलमध्ये सांगितलं कारण
विंडीज कर्णधारालाही समजली टीम इंडियाच्या बॉलर्सची ताकद; पराभवानंतर म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांनी…’