-Sharad Bodage
क्रिकेट हा असा खेळ आहे जो तुम्ही जास्तीत जास्त ४० वयापर्यंत खेळू शकता. म्हणजे टॉप लेवल क्रिकेटमध्ये तरी हिच रिटायरमेंट एज मानतात. आता अपवाद म्हणून प्रवीण तांबे, डॅरेन स्टीव्हन्स हे खऱ्या अर्थाने चाळिशीनंतर गाजतात. तरीदेखील ४० हाच एज बॅरियर. आपला धोनी, पाकिस्तानचा मिसबाह, ऑस्ट्रेलियाचा हॉग यांनी चाळीशी पारही क्रिकेट खेळले. मात्र, काही क्रिकेटर्स इतके कमनशिबी होते की, त्यांना वयाची चाळिशी पार करण्याआधी किंवा चाळिशीतच या जगाचा निरोप घ्यावा लागला. यामध्ये अनेक हरहुन्नरी आणि दिग्गज क्रिकेटर सामील आहेत. तर आजच्या या लेखामध्ये आपण अशाच क्रिकेटर्सविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना खूप लवकर देवाज्ञा झाली.
या यादीची सुरुवातच अशा नावाने होते ज्याने आपल्या छोट्याशा करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. तो वर्ल्ड क्रिकेटचा सुपरस्टार होता. त्याचे नाव हॅन्सी क्रोनिए. दक्षिण आफ्रिकेसाठी आपल्या ऑलराउंड खेळाने त्याने सर्वांची मने जिंकली. कॅप्टन म्हणून तर १३८ पैकी ९९ वनडेत त्याने संघाला विजय मिळवून दिला. मात्र, २००० साली मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे त्याचे करिअर उद्ध्वस्त झाले. आपण मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होतो अशी कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याला बॅन केले गेले. मात्र यापेक्षाही दुःखद घटना दोन वर्षानंतर घडली. एका विमान अपघातात क्रोनिएला आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी त्याचे वय अवघे ३२ वर्ष होते.
वेस्ट इंडिजचा क्रिकेटर रूनाको मॉरटन अनेकांना आठवत असेल. २००६ मध्ये शिवनारायण चंद्रपॉल याला अतिशय हास्यास्पद पद्धतीने रनआऊट करणारा मॉरटन. मॉरटन असा क्रिकेटर होता जो मोठे फटके जितक्या ताकदीने खेळायचा, तितक्याच सफाईदारपणे एकेरी दुहेरी रन्स करायचा. वेस्ट इंडीजसाठी जवळपास आठ वर्ष खेळलेला मॉरटन वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी जग सोडून गेला. एक डोमेस्टिक फर्स्ट क्लास मॅच खेळून येत असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि तो जागीच गतप्राण झाला. कर्टली अंब्रोज यांनी त्याचे कौतुक करताना म्हटले होते की, “तो असा व्यक्ती होता ज्याच्यासोबत मी युद्धावरही गेलो असतो. कारण तो खूप चांगली साथ द्यायचा.”
कसोटी क्रिकेट खेळलेला आणि सर्वात कमी वयात निधन झालेला क्रिकेटर म्हणजे बांगलादेशचा मंजूरल इस्लाम राणा होय. त्याने बांगलादेशसाठी ६ टेस्ट आणि २२ वनडे खेळलेल्या. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्याचे निधन झाले. आपल्या मित्रासोबत तो एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला चालला असताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते दोघेही क्रिकेटर मृत्यू पावले. २००७ मध्ये त्याचा मृत्यू झाला तेव्हा बांगलादेश क्रिकेट संघ वेस्ट इंडीजमध्ये वर्ल्डकप खेळत होता. त्यानंतर बांगलादेश संघाने आपल्या पहिल्या मॅचमध्ये बलाढ्य भारतीय संघाला पराभूत करण्याची किमया केली. बांगलादेशचा कर्णधार हाबिबुल बशर याने तो विजय, राणा याला अर्पण केला होता.
ज्या बॉलींग अटॅकला आजही क्रिकेटविश्वात भेदक बॉलर्स मानले जातात ते म्हणजे वेस्ट इंडीजचे. त्यापैकी एक असलेल्या माल्कम मार्शल यांनादेखील मोठे आयुष्य लाभले नाही. आपल्या वेगाने भल्याभल्यांचा थरकाप उडवणार्या मार्शल यांनी टेस्ट करियरमध्ये ८१ मॅच खेळत ३७६ विकेट्स घेतल्या. आपल्या दैदीप्यमान करियरनंतर त्यांनी कोच बनण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यामुळे वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी त्यांना अखेरचा श्वास घ्यावा लागला. आपल्या धिप्पाड शरीरासाठी ओळखल्या जाणाऱ्या मार्शल यांचे मृत्यूसमयी वजन अवघे २५ किलो झालेले असे सांगितले जाते.
या यादीतील अखेरचे नाव म्हणजे ऑस्ट्रेलियाचा फिल ह्युज. ग्राउंडवर दुखापत होऊन निधन झालेला फिल सर्वात तरुण इंटरनॅशनल क्रिकेटर बनला. २०१४ मध्ये शेफील्ड शिल्डच्या एका सामन्यात सीन ऍबॉट याचा बाउन्सर फिलच्या डोक्यावर लागला. तो जागीच कोसळला. दवाखान्यात घेऊन गेल्यावर त्याने दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र, तो अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाचा सर्वात टॅलेंटेड क्रिकेटर असलेल्या फिलच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट जगत हादरून गेले होते. जवळपास दोन वर्ष ऍबॉट हा त्या मानसिक धक्क्यातून बाहेर आला नव्हता. या जगाचा निरोप घेताना फिल ह्युजचे वय फक्त २६ वर्ष होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘जडेजा टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाचा दावा
रवी शास्त्रींचा प्रशिक्षक लक्ष्मणला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘त्याला’ तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, मग…