पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इतिहास रचला आहे. रोनाल्डो सोशल मीडियावर 1 अब्ज फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला. रोनाल्डोनं 13 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर स्वत: पोस्ट करून याची माहिती दिली.
39 वर्षीय रोनाल्डो इंस्टाग्रामवर जगात सर्वाधिक फॉलो केला जाणारा व्यक्ती आहे. त्याचे इस्टांग्रामवर 63.8 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हा आकडा जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 8 टक्के आहे. याशिवाय रोनाल्डोचे फेसबुकवर 17 कोटी, ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) 11.3 कोटी आणि युट्यूबवर 6 कोटी पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
ख्रिस्तियानो रोनाल्डोनं एक अब्ज फॉलोअर्सचा टप्पा गाठल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचं आभार मानलं. त्यानं लिहिलं, “आपण इतिहास रचला आहे! हा केवळ एक आकडा नाही तर त्यापेक्षा खूप काही मोठं आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. आपण पुढे जात राहू एकत्र इतिहास घडवत राहू.”
रोनाल्डोनं 21 ऑगस्ट 2024 ला त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं. सध्या त्याच्या चॅनलचे 6 कोटी पेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत. यापैकी 5 कोटी पेक्षा अधिक लोक पहिल्या आठवड्यातच जोडले गेले होते. त्याच्या युट्यूब चॅनलनं पहिल्या 24 तासांतच 1 कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला होता.
ख्रिस्तियानॆ रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. तो सध्या सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल नसारकडून खेळतो. 2023 मध्ये या क्लबशी केलेल्या करारानुसार त्यानं 21 कोटी डॉलर्सची कमाई केली. याशिवाय 2023 मध्ये त्यानं जाहिरातींद्वारे 6 कोटी डॉलर्सची कमाई केली. एका रिपोर्टनुसार, 2024 च्या अखेरपर्यंत रोनाल्डोची एकूण कमाई 2 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा पार करेल. या बाबतीत तो बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन आणि गोल्फपटू टायगर वुड्स यांच्या बरोबरीत येईल.
हेही वाचा –
“हा खेळ शरिया कायद्याच्या विरोधात!”, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारची क्रिकेटवर बंदी?
पाकिस्तानी गोलंदाजाने मोडला भुवनेश्वर कुमारचा ऑलटाइम रेकॉर्ड
ऋतुराज गायकवाड की संजू सॅमसन कोण जास्त दुर्दैवी? भारतीय फिरकीपटूने दिली मोठी प्रतिक्रिया