इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम अवघ्या एका महिन्यावर आला आहे. ९ एप्रिलपासून या हंगामाची सुरुवात होणार असून सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात चेन्नईमध्ये रंगणार आहे. तर आयपीएल २०२१ ची अंतिम लढत ३० मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. मात्र महिनाभर आधीच चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी याने सरावाला सुरुवात केली आहे. त्याचे सराव करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बीसीसीआयने आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर करण्यापुर्वीच धोनी चेन्नईला पोहोचला होता. यानंतर नियमानुसार क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यावर आणि कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्याला सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून (८ मार्च) धोनी मैदानात उतरला आहे.
‘थाला’ म्हणून आयपीएल प्रेमींमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या धोनीसह त्याचे शिलेदारही सरावात व्यस्त झाले आहेत. यात अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. तसेच चेन्नईने आयपीएल २०२१ लिलावात विकत घेतलेले एन जगदीशन, साई किशोर आणि सी हरि निशांत हेदेखील धोनीसोबत सराव करताना दिसले आहेत. याबरोबरच युवा गोलंदाज एम हरिशंकर रेड्डीही सराव सत्रात घाम गाळत आहे.
चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी सांगितले की, “चेन्नईचे खेळाडू त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन सराव सत्रात उतरले आहेत. हळूहळू संघातील इतर खेळाडूही क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांच्यासोबत सराव सत्रात जुळतील. येत्या काही दिवसात कर्ण शर्मा आणि भगत वर्माही सरावाला सुरुवात करणार आहेत.”
Thala Dhoni in nets ???? #WhistlePodu #Dhoni pic.twitter.com/HReay2cQ5H
— Chennai Super Kings Fans (@CskIPLTeam) March 9, 2021
Dhoni started his practice in indoor net session at MSD Cricket Academy Chennai ????????#MSDhoni | @MSDhoni | #WhistlePodu pic.twitter.com/ckED5xusOB
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) March 9, 2021
आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आत्तापर्यंत आयपीएलचे ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघ गतवर्षी खास कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे यावर्षी चेन्नईचा संघ दमदार पुनरागमन चौथे जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळेल. १० एप्रिल रोजी मुंबईत युवा खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नईची पहिली लढत होईल.