जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाची तयारी सुरू झाली आहे. आठही संघांना आपले रिटेन केलेले खेळाडू ३० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करायचे आहेत. आतापर्यंत चार वेळा आयपीएल विजेते राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे चार खेळाडू रिटेन करणे जवळपास नक्की झाले आहे. आपण याच चार खेळाडूंविषयी जाणून घेऊया.
एमएस धोनी
सीएसकेला चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार एमएस धोनी याचे रिटेन होणे नक्की आहे. तो पहिल्या हंगामापासून संघाचा भाग असून, त्याचे चेन्नई शहराशी भावनिक नाते आहे. धोनीच्या कामगिरीत मागील काही वर्षात उतार आला असला तरी तो नेतृत्वाने संघाला तारतो. धोनीने आपल्याला अखेरचा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळायचा असल्याचे बोलून दाखवले होते. त्यामुळे धोनी पुढील हंगामातही चेन्नईचे नेतृत्व करताना दिसेल.
रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजालाही चेन्नई सुपर सीएसकेकडून कायम ठेवण्यात येणार आहे. जडेजा हा संघाचा स्टार खेळाडू आहे. त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. जडेजाने गेल्या हंगामात १३ सामन्यांमध्ये ७५ पेक्षा जास्त सरासरीने २२७ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट देखील १४५ पेक्षा जास्त होता. याशिवाय त्याने १३ बळीही आपल्या नावावर केले होते.
ऋतुराज गायकवाड
मागील दोन हंगामात सीएसकेसाठी सर्वात मोठा खेळाडू म्हणून समोर आलेला महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा सीएसकेकडून रिटेन केला जाणारा तिसरा खेळाडू असेल. आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा फटकावून त्याने ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. तसेच तो स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडू ठरला होता. ऋतुराज याला धोनीनंतर सीएसकेचा पुढील कर्णधार म्हणूनही पाहिले जात आहे.
मोईन अली
मोईन अलीने गेल्या हंगामात १५ डावात ३५७ धावा केल्या होत्या. त्याशिवाय ६ बळीही त्याने घेतले होते. अलीचा इकॉनॉमी रेट फक्त ६.३५ होता. तीन भारतीय खेळाडू रिटेन करणे निश्चित असल्यामुळे अखेरच्या जागेसाठी अलीला आपला देशबांधव युवा अष्टपैलू सॅम करनशी स्पर्धा करावी लागली. मात्र, अखेर सीएसके संघ व्यवस्थापनाने अलीच्या अनुभवाकडे पाहत त्याला रिटेन करण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई कसोटीत अजिंक्य खेळणार का? राहुल द्रविड यांचे सूचक वक्तव्य
कोलकाताचे रिटेन केले ‘हे’ नाईट रायडर्स; कर्णधार ओएन मॉर्गनला नारळ
दहा संघाच्या २०२२ आयपीएलचे स्वप्न पावणार भंग?