मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला शुक्रवार(९ एप्रिल) पासून सुरुवात झाली. या हंगामातील दुसरा सामना आज (१० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात चेन्नईने दिलेल्या १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने १८.४ षटकांत पूर्ण करत ७ विकेट्सने सामना जिंकला.
दिल्लीला पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने ११ षटकांमध्येच १०० धावा पार करुन दिल्या होत्या. पण नंतर त्यांची भागीदारी रंगत असताना शॉ १४ व्या षटकात ७२ धावांवर ड्वेन ब्रावोच्या गोलंदाजीवर बाद झाला तर शिखरने पुढे चांगला खेळ कायम ठेवला होता. मात्र., अखेर तो १७ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर चुकला आणि ८५ धावांवर पायचीत झाला.
त्यानंतर अखेर रिषभ पंत आणि मार्कस स्टॉयनिसने दिल्लीला १८० धावांचा टप्पा पार करुन दिला. पण स्टॉयनिस १४ धावांवर ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. शेवटी १९ व्या षटकात रिषभ पंतने चौकारासह दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंतने नाबाद १५ धावा केल्या.
दिल्लीच्या ११ षटकांतच १०० धावा पार
दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी सलामीला फलंदाजीला येत आक्रमक खेळ केला. या दोघांनीही पहिल्या षटकापासून मोठे फटके मारताना सरासरी १० ची धावगती ठेवली. ११ षटकांच्या आतच त्यांनी दिल्लीला १०० धावांचा टप्पा पार करुन देताना वैयक्तिक अर्धशतकही झळकावली.
या दोघांनी ११ षटकांत दिल्लीला बिनबाद ११३ धावा करुन दिल्या. दरम्यान, चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांकडून २ झेलही सुटले.
चेन्नईचे दिल्लीला १८९ धावांचे आव्हान
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने २० षटकांत ६ बाद १८८ धावा केल्या आहेत आणि दिल्लीला धावांचे १८९ धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईकडून सुरेश रैनाने अर्धशतक करत दमदार पुनरागमन केले आहे.
जडेजा-सॅम करनचे आक्रमण
चेन्नईने १६ षटकांत ६ विकेट्स गमावल्यानंतर अखेरच्या ४ षटकांत सॅम करन आणि रविंद्र जडेजाने तुफानी फलंदाजी केली. या दोघांनी अखेरच्या ४ षटकांत ४५ धावा वसूल केल्या. सॅम करन डावाच्या अखेरच्या चेंडूवर ख्रिस वेक्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यापूर्वी त्याने १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावा केल्या. तर जडेजाने १७ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या.
चेन्नईच्या १६ षटकांत १४३ धावा
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खास झाली नाही. सलामीवीर ऋतुराज गायकवाड ५ धावा करुन ख्रिस वोक्सच्या आणि फाफ डू प्लेसिस शुन्यावर आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र त्यानंतर मोईन अली आणि सुरेश रैनाने डाव सांभाळला. त्या दोघांनी ५३ धावांची भागीदारी केली. पण आक्रमक खेळणाऱ्या अलीला आर अश्विनने बाद करत ही भागीदारी तोडली. अली २४ चेंडूत ३६ धावांवर बाद झाला.
त्यानंतरही अंबाती रायडूने रैनाला दमदार साथ दिली. या दरम्यान रैनाने त्याचे ३९ वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. रायडू आणि रैना यांच्यात ६३ धावांची भागीदारी झाली. पण रायडू २३ धावांवर टॉम करनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ काही वेळातच रैना रविंद्र जडेजाबरोबर फलंदाजी करत असताना धाव घेण्याचा प्रयत्नात धावबाद झाला. रैनाने ३६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावा केल्या. रैना बाद झाल्यानंतर कर्णधार एमएस धोनी फलंदाजीला आला. मात्र, तो खास काही करु शकला नाही. धोनीला शुन्यावर आवेश खानने त्रिफळाचीत केले.
चेन्नईने १६ षटकांत ६ बाद १४३ धावा केल्या आहेत.
दिल्लीने जिंकली नाणेफेक
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यापासून रिषभ पंत दिल्ली संघाचे नेतृत्त्व या हंगामात सांभाळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, त्याचा आदर्श असलेला एमएस धोनीच्याच विरुद्ध त्याला पहिला सामना कर्णधार म्हणून खेळायचा आहे. धोनी हा चेन्नईला कर्णधार आहे.
या सामन्यासाठी चेन्नईने अंतिम ११ जणांच्या संघात फाफ डू प्लेसिस, सॅम करन, मोईन अली आणि ड्वेन ब्रावो या ४ परदेशी खेळाडूंना संघी दिली आहे. तर शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, टॉम करन आणि ख्रिस वोक्स या ४ परदेशी खेळाडूंना दिल्ली कॅपिटल्सने अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्टिव्ह स्मिथला अंतिम ११ जणांच्या दिल्ली संघात स्थान मिळालेले नाही. तसेच टॉम करन या सामन्यातून दिल्ली संघाकडून पदार्पण करत आहे.
असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ –
चेन्नई सुपर किंग्स – ऋतूराज गायकवाड, अंबाती रायुडू, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), मोईन अली, रवींद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर.
दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, ख्रिस वॉक्स, रविचंद्रन अश्विन, टॉम करन, अमित मिश्रा, अवेश खान.