पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने असे सुचवले आहे की, पाकिस्तानला खराब कामगिरीनंतर मैदानावरील आणि मैदानाबाहेरील दोन्ही समस्या सोडवण्यासाठी गौतम गंभीरसारख्या कठोर प्रशिक्षकाची गरज आहे. वनडे विश्वचषक 2023 मधील खराब कामगिरीनंतर, पाकिस्तानने गॅरी कर्स्टन यांची मर्यादित षटकांच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेली. जेसन गिलेस्पी याच्याकडे कसोटी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. मात्र, या बदलाने कोणताही फरक पडला नव्हता. कारण पाकिस्तानची टी20 विश्वचषक 2024 मध्ये खराब कामगिरी झाली होती, जिथे ते गट फेरीतून बाहेर पडले होते.
अलीकडेच पाकिस्तानला बांगलादेशकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. ज्यात त्यांना 2-0 असा कसोटी मालिकेत पराभव पाहावा लागलेला. त्याविषयी एका मुलाखतीत बोलताना कनेरिया म्हणाला, “गौतम गंभीर हा महान क्रिकेटर आहे. तो एक चांगला माणूस आहे. तो सर्व काही समोर सांगतो. तो तुमच्या पाठीमागे कधीच काही बोलणार नाही. तो तुमच्या तोंडावर असेल ते बोलतो आणि तसे असणे आवश्यक आहे.”
कनेरिया पुढे म्हणाला की, “तुम्हाला कठोर निर्णय घेणारा प्रशिक्षक हवा आहे. गंभीर नेमका तसच आहे. पाकिस्तानलाही अशा प्रशिक्षकाची गरज आहे. जो खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळण्यास घाबरणार नाही. ज्याच्या हातात मोठे निर्णय घेण्याची ताकद असेल, असा व्यक्ती ही गोष्ट करतो.”
बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर आता अशा बातम्या येत आहेत की, शान मसूदला कसोटी कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. तसेच, बाबर आझमला टी-20च्या कर्णधारपदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी मोहम्मद रिझवान तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार होऊ शकतो. दुसरीकडे, भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ प्रथमच कसोटी मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Duleep Trophy: भारताच्या ‘या’ स्टार फिरकीपटूची खतरनाक गोलंदाजी, घेतल्या 7 विकेट्स
“तेंडुलकरने अख्तरला खतरनाक…” 2003च्या विश्वचषकाची आठवण करून देत ‘या’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य