आयपीएल सुरू होते तेव्हा प्लेयर्स, सपोर्ट स्टाफ इतकच महत्व काही लोकांना मिळतं. हे लोक माजी क्रिकेटर असतात. ते कॉमेंटेटर असतात. सगळ्याच बाबतीत टॉप असलेली आयपीएल आणखी इंटरेस्टिंग व्हावी म्हणून, बीसीसीआय दरवर्षी इंडियन कॉमेंटेटर्स सोबतच इंटरनॅशनल कॉमेंटेटर्सही बोलावते. त्यातील काही दिग्गज असतात तर काही नुकतेच रिटायर होऊन कॉमेंट्रीत दुसरी इनिंग सुरू केलेले, पण आज आयपीएलचा पंधरावा सिझन सुरू असताना, एक फॉरेनर कॉमेंटेटर कायम आपल्याला दिसतो, आपल्याला आवडतो, तो म्हणजे न्यूझीलंडचे डॅनी मॉरीसन.
डॅनी मॉरीसन यांचं क्रिकेट करियर कसं होतं? त्यांनी काय काय अचीव केलं? असे प्रश्न विचारल्यावर त्याची उत्तर मिळायची नाहीत, पण त्यांच्या कॉमेंट्रीची नक्कल करणारे आपल्याकडे गल्लीगल्लीत दिसतील. बऱ्याच जणांना डॅनी मॉरीसन माहीत झाले ते आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतानाच. ज्या शहरात मॅच असेल तिथल्या लोकल लैंग्वेजमध्ये लोकांचे स्वागत करायची त्याची पद्धत निव्वळ अफलातून. पुण्यात मॅच असली की ‘कसं काय पुणे’, गुजरातला गेल्यावर ‘केम छो.’ हे त्यांच्या इंग्लिश एक्सेंटमध्ये भलतच श्रवणीय वाटतं. अशा या सर्वांच्या आवडीच्या डॅनी मॉरीसन यांनी आयपीएलमध्ये एक असं कांड केलं, ज्याची दरवर्षी आयपीएलमध्ये चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.
हेही पाहा- डॅनी मॉरिसनच्या अनेक कारामतींमधील एक घटना
आता मॅचआधी आणि मॅचनंतर बिल्डअप म्हणून क्रिकेट लाईव्ह दाखवलं जात. जतीन सप्रू, तान्या पुरोहित यांच्या जोडीला आणखी काही अँकर आणि आकाश चोप्रा, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ यांच्यासारखे माजी क्रिकेटर हा शो करताना दिसतात. तसंच जेव्हा आयपीएल सेट मॅक्सवर दाखवली जायची तेव्हाची एक्स्ट्रा इनिंग नावाच्या बिल्ड अप शोची टीम जबरदस्त होती. एकतर सिद्धू तिथे असायचे. जोडीला समीर कोचर आणि गौरव कपूर हे बाप सेन्स ऑफ ह्युमर असलेले अँकर. आणि ग्लॅमरचा तडका म्हणून शिबानी दांडेकर, मयंती लॅंगर, अर्चना विजया यांच्यासारख्या सुपरमॉडेल कम अँकर.
खरंतर २०१३च्या आयपीएलला दोन नव्या अँकर्स आल्या होत्या. एक होती मिस इंडिया इंटरनॅशनल रोशेल राव आणि दुसरी ब्रिटिश इंडियन मॉडेल तसेच बिग बॉस कंटेस्टेंट करिष्मा कोटक. सौंदर्याचं वरदान लाभलेल्या करिष्माचा आणि क्रिकेटचा तसा काहीच संबंध नव्हता. तरीही एक प्रकारे शोपीस म्हणून ग्राउंडच्या बाजूने फिरायचं आणि दोन्ही टीम्समधील एखाद दोन जणांचा इंटरव्ह्यू घ्यायचा इतकच त्यांचं काम.
त्या सिझनला आपल्या पुण्याच्या ग्राउंडवर पुणे वॉरियर्स इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांची मॅच व्हायची होती. नेमकं त्या मॅचआधी ग्राउंडवरून लाईव्ह एक्स्ट्रा इनिंग करायची जबाबदारी होती करिष्मा कोटक आणि डॅनी मॉरीसन यांच्यावर. करिष्मा स्टुडिओतील समीर कोचरला ग्राउंडवरून अपडेट देत असताना, डॅनी तिथे आले. करिष्माने त्यांना मॅचबद्दल काही प्रश्न विचारला, पण प्रश्नाचे उत्तर द्यायच्या आधी डॅनी डान्स करू लागले. डान्स करता करता त्यांना काय झाले काय माहित?, आणि त्यांनी सरळ करिष्माच्या कंबरेत हात घालून तिला उचलली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने करिष्मा शॉक झाली. अगदी काही सेकंदच मॉरिसन यांनी तिला उचलले तरी, घटना कॅमेऱ्यात कैद झालेली.
तिकडे सोशल मीडियावर मात्र प्रतिक्रियांचा महापूरच आला. डॅनी प्रचंड ट्रोल झाले. खरं तर ही आयपीएलच्या इतिहासातील एक लाजिरवाणी घटना होती. अशा प्रकारच्या घटना विदेशात कॉमन असल्या तरी भारतात, असं कोणी पाहिलं नव्हतं. शेवटी दोन-चार दिवसात प्रकरण निवळले. राहिली फक्त युट्यूबवर त्या व्हिडिओची क्लिप.
खरंतर डॅनी मॉरीसन यांनी असं काही करण्याची ही पहिली वेळ नव्हती. आयपीएलमध्येच त्यांनी कितीतरी वेळा आपल्या फिमेल अँकर्सना ऑन कॅमेरा मिठी मारलेली. या साऱ्यावर कडी म्हणजे त्यांनी दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचा दुसरा सीझन होत असताना, एका चियर लिडरला चक्क खांद्यावर बसवलेल. डॅनी अशी कृत्ये जाणीवपूर्वक आणि मुद्दाम करतात की, त्यांच्यातील खोडकर स्वभावामुळे हे घडते, याचे उत्तर कोणालाही माहीत नाही, पण नेहमीच सिरीयस असणारी इंग्लिश कॉमेंट्री त्यांच्यामुळे मजेदार वाटती हे मात्र खरे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या नावावर असणारे लाजिरवाणे विक्रम; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘नको रे बाबा!’
कितीही ट्रोल केला गेला असला, तरी पॉंटिंगला भावलेला डिंडा भारतासाठी खेळलाच