टेनिस जगतात २९ वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली होती ज्यामुळे संपूर्ण जग हादरले होते. टेनिस कोर्टवर एक अशी घटना घडली ज्याबद्दल कोणी विचारही करू शकत नव्हते. त्या काळातील उदयोन्मुख टेनिसपटू मोनिका सेलेसवर चालु सामन्यादरम्यान एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. या घटनेने सेलेसचे आयुष्यच नव्हे, तर संपूर्ण महिला टेनिसचेही चित्र पालटून गेले.
सेलेसने (Monica Seles) वयाच्या १४व्या वर्षी टेनिसपटू म्हणून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तसेच १६ व्यावर्षी फ्रेंच ओपनमध्ये पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. तिने कमी वयात खूप प्रसिद्धी मिळवली होती. १९ व्या वयापर्यंत तिने २१ एकेरी विजेतीपदे जिंकली होती. यामध्ये ८ ग्रँड स्लॅम्सचादेखील समावेश आहे. याव्यतिरिक्त १९९१, १९९२ आणि १९९५मध्ये ती जागतिक महिला टेनिस क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होती.
यानंतर ३० एप्रिल १९९३ला सेलेसने जर्मनीच्या हॅमबर्ग शहरात होत असलेल्या सिटिझन कपमध्ये भाग घेतला होता. सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये सेलेस ४-३ने पुढे होती. तेव्हाच विश्रांतीसाठी ब्रेक देण्यात आला होता. सेलेस आपल्या खुर्चीजवळ येऊन बसली होती, तेव्हाच गुंतेर पार्श नावाच्या व्यक्तीने मोनिकाच्या पाठीत धारदार चाकूने हल्ला (Knife Attack) केला होता. दुसरा हल्ला करण्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले होते. कोर्टवर उपस्थित डॉक्टरांनी तिला लगेच स्ट्रेचरवर झोपवून रुग्णालयात घेऊन गेले.
#UnDíaComoHoy En 1993, la 1.º del mundo Monica Seles fue apuñalada por la espalda por un "fanático" de Steffi Graf, su gran rival, en Hamburgo.
Con 19 años ya ostentaba 8 títulos de Grand Slam y era candidata a ser la tenista más ganadora de la historia.https://t.co/eZIfc5FO5A
— ABC Deportes (@ABCDeportes) April 30, 2020
हल्लेखोराची विचारपूस केली असता त्याने सांगितले की, “मी त्या काळातील सर्वात प्रसिद्ध टेनिसपटू स्टेफी ग्राफचा (Steffi Graph) मोठा चाहता होतो. मला असे वाटते होते की, सेलेस स्टेफीसाठी समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे मी दु:खी होतो. सेलेसने मार्च १९९१मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतपद पटकाविले होते. त्यामुळे ती १८६ आठवड्यांपासून जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहिली होती. तसेच तिने स्टेफीलाही मागे टाकले होते.”
“मला असे वाटत होते की, स्टेफी नेहमी अव्वल क्रमांकावर रहावी. त्यामुळे तिचा सूड घेण्यासाठी मी मोनिकावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला,” असेही तो म्हणाला.
या हल्ल्यामुळे सेलेस २७ महिन्यांसाठी टेनिसपासून दूर राहिली होती. १९९५मध्ये तिने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. तसेच तिने कॅनेडियन ओपन जिंकत आपण अजून संपलेलो नाही असे दाखवून दिले. सेलेसने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. परंतु ती स्टेफीविरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत झाली. जानेवारी १९९६मध्ये सेलेसने कारकीर्दीतील ऑस्ट्रेलियन ओपनचे चौथे विजेतेपद पटकाविले होते. तसेच ही सेलेसच्या कारकीर्दीतील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा ठरली.
वाचा –
धक्कादायक! ६ वेळा ग्रँड स्लॅमचे विजेतेपद पटकावणाऱ्या दिग्गज टेनिसपटूला अडीच वर्षांचा तुरुंगवास
मोठी बातमी! वयाच्या २५ व्या वर्षीच ऍश्ले बार्टीचा टेनिसला गुडबाय, जागतिक क्रमवारीत होती अव्वल
–राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन खेळाडू