केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चेंडू छेडछाड प्रकरण सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलेच गाजत आहे. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत.
या सर्व प्रकरणामागे ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर मुख्य सूत्रधार आहे. काल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत खुलासा केला आहे.
तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेले माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर काल त्यांनी त्यांच्या निलंबनाचा कालावधीही घोषित केला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाप्रमाणे स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच बॅनक्रोफ्टवर ९ महिन्यांची बंदीची कारवाई झाली आहे. या तीनही खेळाडूंना त्यांच्या बंदीच्या काळात फक्त क्लब क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण क्लब क्रिकेट व्यतिरिक्त त्यांना बाकी कोणत्याही क्रिकेटचे सामने खेळता येणार नाही.
यानंतर वार्नरला कधीही ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व करता येणार नाही.
आज प्रथमच या सर्व प्रकरणावर वॉर्नरने भाष्य केले आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली आहे.
“सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रेमी आणि जगातील चाहत्यांनो मी पुन्हा सिडनीला येत आहे. ज्या चुका झाल्या त्यामुळे क्रिकेटचे नुकसान झाले.मी सर्वांची माफी मागतो आणि याची सर्व जबाबदारी घेतो.
या चुकांमूळे क्रिकेट प्रेमींना झालेले दु:ख मी समजतो. ज्या खेळावर मी बालपणापासून प्रेम केले त्यावर हा एक डाग लागला आहे. मला आता थोडी शांततेची गरज असून परीवाराबरोबर वेळ घालवायचा आहे. तसेच मला विश्वासू सल्लागाराचीही मदत घ्यावी लागणार आहे. तुम्हाला लवकरच माझ्याकडून काहीतरी चांगलं कळेल. ” असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
— David Warner (@davidwarner31) March 29, 2018