टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ विकेट्स राखून पराभूत केले आणि त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठे लक्ष्य उभे केले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आणि संघाला विजय मिळवून दिला होता. ऑस्ट्रेलियाच्या विजयात सलामीवीर डेविड वॉर्नरने महत्वाची भूमिका पार पाडली. तत्पूर्वी त्याला यावर्षी आयपीएलमध्ये मानहानीकारक वागणूक मिळाली होती. त्यानंतर वॉर्नरने आता जबरदस्त पुनरागमन केले आहे. वॉर्नरला आयपीएलमध्ये मिळालेल्या वागणूकीमागे एक खास ‘इंग्लंड कनेक्शन’ होते.
वॉर्नरने या सामन्यात एकूण ३८ चेंडूंचा सामना केला आणि ५३ धावा केल्या. यामध्ये त्याच्या चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. तत्पूर्वी आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात वॉर्नरकडून सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व काढून घेतले गेले होते आणि केन विलियम्सनला संघाचा नवीन कर्णधार केले गेले होते. एवढेच नाही तर, वार्नरला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटच्या काही सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमध्येही सामील केले गेले नव्हते. राजस्थान रॉयल्ससोबत झालेल्या एका सामन्यात तर त्याला हॉटेल रूममध्येच सोडले गेले होते. मात्र सनरायझर्स हैदराबादमध्ये केल्या गेलेल्या या बदलांचा संघाला काही खास फायदा झाला नाही.
वॉर्नरला संघाच्या बाहेर ठेवण्याविषयी हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस म्हणाले होते की, “युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी खराब फॉर्मशी झगडत असलेल्या वॉर्नरला बाहेर ठेवले गेले.” ट्रेवल बेलिस यापूर्वी २०१५ ते २०१९ दरम्यान इंग्लंड संघाचे प्रशिक्षक होते आणि वॉर्नला हैदराबाद संघातून बाहेर करण्याविषयी निर्णय त्यांच्या मागणीमुळे घेण्यात आला, अशी माहिती समोर आली होती. असे असले तरी, वार्नरने टी-२० विश्वचषकात दमदार पुनरागमन करून टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अंतिम सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच म्हणाला की, “मला विश्वास होत नाहीय की, लोकांनी वॉर्नरला काही आठवड्यांपूर्वी हे म्हणत नाकारले होते की, तो आता संपला आहे. ही गोष्ट वॉर्नरला खटकत होती.”
दरम्यान, टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य १८.५ षटकात आणि २ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. यामध्ये डेविड वॉर्नरचे (५३) अर्धशतक आणि मिशेल मार्शच्या नाबाद ७७ धावांचे महत्वाचे योगदान होते. त्याव्यतिरिक्त जोस हेजलवूडने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अंतिम सामना संपल्यानंतर डेविड वॉर्नरला मालिकावीर निवडले गेले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात फ्लॉप झालेल्या कोहलीने फिंचकडून शिकाव्यात ‘या’ गोष्टी, ज्याचा भारताला होईल फायदा!
T20 WC Final: मोठ्या सामन्यात माती खाणाऱ्या न्यूझीलंड संघावर मिम्सचा वर्षाव, भन्नाट विनोदही बनले
चँपियन ऑस्ट्रेलियाला चाहत्यांकडून ‘गार्ड ऑफ हॉनर’, बँड बाजाच्या आवाजाने चढवली रंगत; व्हिडिओ व्हायरल