दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२२च्या ३२ व्या सामन्यात पंजाब किंग्जला धूळ चारली. पंजाबने दिलेले छोटे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सने ९ विकेट्स राखून आणि अवघ्या ११ व्या षटकात गाठले. सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने दिल्लीसाठी महत्वाची खेळी केली आणि संघाला सोपा विजय मिळवून दिला. असे असले तरी, या अप्रतिम प्रदर्शनानंतर देखील वॉर्नरच्या मुलींचे समाधान होणार नाहीये. यामागे जोस बटलर कारण आहे.
सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम गोलंदाजी करताना दिल्लीच्या गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केले आणि पंजाबला अवघ्या ११५ धावांवर रोखले. या धावा करण्यासाठी पंजाबने २० षटके खेळून काढली आणि सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा सलामीवीर जोडी पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर (David Warner) यांनी ८३ धावांची भागीदारी पार पाडली. शॉ ४१ धावा करून बाद झाला, पण वॉर्नर मात्र शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. वॉर्नरने ३० चेंडूत ६० धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबवर विजय मिळवल्यानंतर वॉर्नरने खास प्रतिक्रिया दिली. सामना जिंकल्यानंतर त्याने त्याच्या मुलींचे म्हणणे माध्यमांसमोर मांडले. तो म्हणाला की, “माझ्या मुलींना हे जाणून घ्यायचे आहे की, मला जोस बटलरप्रमाणे (Jos Buttler) शतक का करता आले नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे की, लहान मुलं खेळाला अशाप्रकारे समजून घेऊ लागले आहेत.”
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर चालू आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. चालू हंगामातील त्याचे प्रदर्शन खूपच जबरदस्त राहिले आहे, यादरम्यान त्याने दोन शतके ठोकली आहेत. पहिले शतक मुंबई इंडियन्सविरुद्ध, तर दुसरे शतक सोमवारी (१८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केले. अशात आता वॉर्नच्या मुलींची देखील इच्छा आहे की, त्यांच्या वडिलांनी देखील बटलरप्रमाणे मैदानात शतकी खेळी करावी.
दरम्यान, वॉर्नर मागच्या आयपीएल हंगामापर्यंत सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता. आयपीएल २०१६मध्ये त्याच्याच नेतृत्वात हैदराबादने विजेतेपद पटकावले होते. परंतु मागचा हंगाम त्याच्यासाठी एका भयानक स्पप्नासारखा ठरला. यादरम्यान, त्याच्याकडून हैदराबाद संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले आणि काही सामन्यात खेळण्याची संधी देखील मिळाली नाही. त्यानंतर वॉर्नरने हैदराबाद संघाची साथ सोडली आणि त्याचा जुना संघ दिल्ली कॅपिटल्सने त्याला मेगा लिलावात विकत घेतले. वॉर्नरने आतापर्यंत १५४ आयपीएल सामने खेळले आहेत आणि यामध्ये ५३ अर्धशतके आणि ४ शतके केली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा मैदानात घोंगावलं होतं पोलार्ड नावाचं वादळ, श्रीलंकेविरुद्ध एकाच षटकात ठोकले होते सलग ६ षटकार
चेन्नईच्या सलामीवीराने लग्नासाठी सोडला बायोबबल, जाणून घ्या कधी होणार पुनरागमन