---Advertisement---

दीपक-भुवनेश्वरच्या जोडीचा मोठा पराक्रम! नाबाद ८४ धावांच्या भागीदारीसह ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवला दुसरा क्रमांक

On: बुधवार, जुलै 21, 2021 1:16 AM
---Advertisement---

कोलंबो। मंगळवारी (२० जुलै) भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवला. तसेच ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरने ८ व्या विकेटसाठी केलेल्या नाबाद भागीदारीचे योगदान मोठे होते. त्यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करण्याबरोबरच एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात श्रीलंकेने भारताला २७६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. पण, याचवेळी दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने भारताच्या डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि नाबाद अर्धशतकी खेळी करत सामन्यात रंगत आणली. त्यांनी ८ व्या विकेटसाठी ८४ चेंडूत नाबाद ८४ धावांची भागीदारी रचली आणि भारताला ४९.१ षटकात विजय मिळवून दिला.

त्याचबरोबर भारताकडून वनडेत ८ व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी रचणाऱ्या जोड्यांच्या यादीत त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला. त्यांनी यावेळी हरभजन सिंग आणि प्रविण कुमार यांच्या जोडीची बरोबरी केली आहे. हरभजन सिंग आणि प्रविण कुमार यांनी २००९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांची भागीदारी ८ व्या विकेटसाठी केली होती.

या यादीत अव्वल क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आणि एमएस धोनी यांच्या जोडीचा क्रमांक लागतो. त्यांनी २०१७ साली श्रीलंकेविरुद्धच नाबाद १०० धावांची भागीदारी ८ व्या विकेटसाठी केली होती.

मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध भुवनेश्वर कुमारने नाबाद १९ धावा केल्या. तर दीपक चाहरने अर्धशतकी खेळी करताना ८२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या.

सूर्यकुमारचे अर्धशतक 
या सामन्यात दीपक चाहर व्यतिरिक्त भारताकडून सूर्यकुमार यादवनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने ४४ चेंडूत ६ चौकारांसह ५३ धावा केल्या. त्याशिवाय भारताकडून मनिष पांडेने ३७ धावांची आणि कृणाल पंड्याने ३५ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय खेळाडूला ३० धावांचा आकडा पार करता आला नाही.  श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेकडून २ खेळाडूंचे अर्धशतक
या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि चरिथ असलंका यांनी अर्धशतके झळकावली. फर्नांडोने ५० धावांची आणि असलंकाने ६५ धावांची खेळी केली. याशिवाय चमिका करुणारत्नेने नाबाद ४४ धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने ५० षटकांत ९ बाद २७५ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहरने २ विकेट घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

अर्धशतक एक विक्रम अनेक! दीपक चाहरने नाबाद अर्धशतकी खेळीसह चार मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

मोठी बातमी! इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्या सराव सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जखमी; न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये

भारतीय संघासाठी आंनदाची बातमी! सराव सामन्यात केएल राहुलचे शतक, तर जडेजानेही ठोकले अर्धशतक, पाहा व्हिडिओ

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---