गतविजेता बेंगळुरू ब्लास्टर्सविरुद्ध पराभूत

कोची । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शनिवारी गतविजेत्या बेंगळुरू एफसीला येथील नेहरू स्टेडियमवर केरला ब्लास्टर्सविरुद्ध 1-2 असे पराभूत व्हावे लागले. खाते आधी उघडूनही बेंगळुरूला लौकीकास साजेसा खेळ करता आला नाही. कर्णधार बार्थोलोम्यू ओगबेचे याने दोन्ही गोल करीत ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावरील विजय साकार केला.

बेंगळुरूचे बाद फेरीतील स्थान यापूर्वीच नक्की झाले असले तरी दक्षिणेतील कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्यांना पत्करावा लागलेला पराभव निराशाजनक ठरला. देशोर्न ब्राऊनच्या गोलमुळे बेंगळुरूने लवकर खाते उघडले होते.

बेंगळुरूला 17 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला असून आठ विजय व पाच बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 29 गुण आहेत. त्यांचे तिसरे स्थान कायम राहिले.

बाद फेरीच्या आशा आटोपलेल्या ब्लास्टर्सने एक क्रमांक प्रगती करीत सातवे स्थान गाठताना जमशेदपूर एफसीला (17 सामन्यांतून 18) मागे टाकले. ब्ला्टर्सचा हा चौथा विजय असून सहा बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 18 गुण झाले. ब्लास्टर्सचा गोलफरक सरस ठरला. ब्लास्टर्सचा गोलफरक उणे 3 (25-28), तर जमशेदपूरचा उणे 8 (22-3) असा आहे.

खाते उघडण्याची शर्यत बेंगळुरूने जिंकली. 16व्या मिनिटाला मध्य फळीतील सुरेश वांगजाम याने मारलेल्या चेंडूवर ब्राऊनने उजव्या पायाने नियंत्रण मिळविले. त्यानंतर त्याने गोलक्षेत्रातून अचूक अंदाज घेत ब्लास्टर्सचा गोलरक्षक बिलाल खान याला चकविले.

ब्लास्टर्सने पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत बरोबरी साधली. बदली खेळाडू जियान्नी झुईवर्लून याच्या पासवर ओगबेचेने लक्ष्य साधले. त्यानंतर 70व्या मिनिटाला ब्लास्टर्सने आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मेस्सी बौलीने चेंडू मिळताच आगेकूच केली. त्याने छातीवर चेंडू नियंत्रीत केला. त्याचवेळी बेंगळुरूच्या अल्बर्ट सेरॅन याने त्याला जर्सीला धरून पाडले. त्यामुळे पंच एल. अजितकुमार मैतेई यांनी ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल केली. त्यावर ओगबेचेने बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूला चकवित गोल केला.

दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी बेंगळुरूच्या आशिक कुरुनीयन याने घोडदौड करीत चेंडू मारला, पण तो व्लाच्को ड्रोबारोवने थोपविला. चेंडू बाहेर गेल्याने बेंगळुरूला कॉर्नर मिळाला, पण त्यावर विशेष काही घडले नाही.

दोन मिनिटांनी ब्लास्टर्सने प्रयत्न केला. डावीकडून मिळालेल्या पासवर मेस्सी बौलीने हेडिंगवर चेंडू साहल अब्दुल समद याच्या दिशेने मारला, पण समदचा फटका निशू कुमारने ब्लॉक केला.

You might also like