इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामातील उर्वरित सामने लवकरच यूएईमध्ये होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९ सप्टेंबरपासून उर्वरित आयपीएल सामने होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आयपीएलच्या सर्व संघांची उर्वरित सामन्यांसाठी जोरदार तयारी सुरू आहे.
यातच एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, दिल्ली कॅपिटल्सचा संघ शनिवारी (२१ ऑगस्ट) यूएईला रवाना होणार आहे. श्रेयस अय्यर याआधीच फिटनेस प्रशिक्षकांसोबत यूएईला रवाना झाला होता. श्रेयस अय्यर यंदाच्या आयपीएलपूर्वीच दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला आयपीएलमधून आपले नाव मागे घ्यावे लागले होते. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. पण आता अय्यर पूर्ण तंदुरुस्त झाला आहे. यामुळे पंत किंवा अय्यर यांच्यातील कोण दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सांभाळणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
एएनआयसोबत बोलताना दिल्ली कॅपिटल्सचा एक अधिकारी म्हणाला, “दिल्ली कॅपिटल्स संघ दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामन्यांसाठी शनिवारी (२१ ऑगस्ट) सकाळी यूएईला रवाना होणार आहे. भारतीय खेळाडू आणि अधिकाऱ्यांसोबत दिल्लीचा संघ यूएईला रवाना होणार आहे. खेळाडूंना आधीपासूनच दिल्लीमध्ये विलगीकरणात ठेवले गेले आहे. यानंतर यूएईला गेल्यावर देखील एका आठवड्यासाठी त्यांना विलिगिकरणात ठेवले जाणार आहे. यानंतर त्यांच्या सरावाला सुरुवात होणार आहे.”
“श्रेयस अय्यर आधीपासूनच फिटनेस प्रशिक्षकांसोबत यूएईला पोहोचला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि काही भारतीय खेळाडू त्यांचे आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण करून ते नंतर संघासोबत सामील होणार आहेत. त्याचबरोबर पंत आणि अय्यर यांच्यात कर्णधार कोण असेल? हे अजूनही स्पष्ट नाही. संघ व्यवस्थापनाने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.” असेही ते म्हणाले.
दरम्यान आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ याआधीच यूएईला रवाना झालेले आहेत. १९ सप्टेंबरला पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात झालेल्या सामन्यांमध्ये, सर्वाधिक ८ पैकी ६ विजयांसह दिल्लीचा संघ अव्वल स्थानावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
–भर मैदानात तंबू लावून सामन्याचा आनंद लुटू लागला ‘हा’ व्यक्ती; व्हिडिओ बघून म्हणाल, ‘ओळखीचा दिसतोय’
–‘महिलांसाठी ६ संघांची आयपीएल सुरू करा’; स्म्रीती मंधानाची मागणी पूर्ण करणार का बीसीसीआय?
–पुढील तीन महिने चाहत्यांसाठी पर्वणी! युएईत भरणार क्रिकेट कार्निवल