---Advertisement---

Video: सूर्यकुमारच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला!

---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५५ वा सामना शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ४२ धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी तुफानी फलंदाजी करत मोलाचा वाटा उचलला. पण, सूर्यकुमार फलंदाजी करत असताना अशी एक घटना घडली की भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

अन् सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला चेंडू
आयपीएल २०२१ हंगामातील उत्तरार्धात आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वाधिक प्रभावित करणारा गोलंदाज म्हणजे जम्मू-काश्मिरचा उम्रान मलिक. त्याने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण करत आपल्या वेगामुळे सर्वांचेच लक्ष वेधले. त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडूही टाकला आहे. पण, त्याच्या सूर्यकुमारला टाकलेल्या एका वेगवान चेंडूने सर्वांनाच धक्का दिला होता.

झाले असे की शुक्रवारी मुंबई इंडियन्स संघ फलंदाजी करताना १९ व्या षटकात उम्रान गोलंदाजी करत होता. त्यावेळी सूर्यकुमार फलंदाजी करत होता. त्याने या षटकात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूंवर चौकार वसूल केले होते. पण, उम्रानने पाचव्या चेंडूवर पुनरागमन केले. त्याने हा चेंडू जवळपास १४१ किमी प्रतितास वेगाने टाकला. हा चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर जाऊन जोरदार आदळला. आणि बॅकवर्ड पाँइंटच्या दिशेने गेला.

हा चेंडू लागल्यानंतर सूर्यकुमारलाही वेदना झाल्याचे दिसले. त्यानेही लगेच हेल्मेट काढले. तसेच अन्य खेळाडूही त्याच्या जवळ गेले. याशिवाय मुंबईचे वैद्यकिय पथकही मैदानात आले. पण, दुखापत गंभीर नसल्याचे जाणवल्यानंतर सूर्यकुमारने पुढे खेळणे चालू ठेवले होते.

https://twitter.com/Sunainagosh7/status/1446510434417184768

मुंबईने सामना जिंकला 
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णयाला मुंबईचे फलंदाज इशान आणि सूर्यकुमारने योग्य न्याय देत आक्रमक फलंदाजी केली. इशानने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमारने ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त बाकी प्रमुख फलंदाजांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. मुंबईने २० षटकांत ९ बाद २३५ धावा केल्या. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादला २० षटकात ८ बाद १९३ धावाच करता आल्या. हैदराबादकडून प्रभारी कर्णधार मनीष पांडेने ४१ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच जेसन रॉयने ३४ आणि अभिषेक शर्माने ३३ धावा केल्या, तर रियान परागने २९ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणालाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर-नाईल आणि जिमी निशामने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

मुंबईचे आव्हान संपुष्टात 
या सामन्यादरम्यान मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी होती. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी १७० पेक्षा अधिक धावांनी विजयाची गरज होती. पण, ही गोष्ट शक्य झाली नसल्याने मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले.

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद २३५ धावा केल्या आणि हैदराबादला २३६ धावांचे आव्हान दिले होते. त्यामुळे, जर मुंबईने हैदराबादला ६५ धावांवर सर्वबाद केले असले, तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला असता. पण हैदराबादने २० षटकात ८ बाद १९३ धावा केल्या आणि मुंबईने केवळ ४२ धावांनी सामना जिंकला. त्यामुळे मुंबईचे आयपीएल २०२१ मधील आव्हान संपले.

महत्त्वाच्या बातम्या –

रमीझ राजा यांच्या विधानात किती तथ्य? आयसीसीच्या फंडिंगमध्ये खरंच आहे का बीसीसीआयचा दबदबा, वाचा सविस्तर

भारीच! हरभजन सिंगला फ्रान्समधील युनिव्हर्सिटीने दिली मानद डॉक्टरेट पदवी; ‘हे’ आहे कारण

हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल रोहित शर्माने दिली महत्त्वाची माहिती; सांगितले कधी सुरू करू शकतो गोलंदाजी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---