fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

देशासाठी काहीही करु शकतो – शिखर धवन

मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात केएल राहूलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्यात आले होते. त्यामुळे या वनडेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र क्रमवारीत बदल करण्याचा हा निर्णय चूकीचा असल्याचे नंतर विराटने मान्य केले.

पण आता भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन म्हणाला, ‘मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे.’

ऑस्ट्रेलियाने मुंबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताला 10 विकेटसने पराभूत केले. या सामन्यानंतर धवन म्हणाला, ‘जर मला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले गेले तर मी तयार आहे. मी देशासाठी काहीही करू शकतो.’

धवन म्हणाला, ‘आपल्याला मानसिकदृष्ट्या बळकट असले पाहिजे आणि सर्व खेळाडू मजबूत आहेत. हेच कारण आहे की आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहोत. हा प्रवासाचा एक भाग आहे. कधीकधी क्रम बदलावा लागतो.’

तसेच पुढे धवन म्हणाला, तिसर्‍या ऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याचा निर्णय  स्वतः कोहलीचा  होता.

तो म्हणाला, “हा कर्णधाराचा निर्णय होता. राहुल चांगली फलंदाजी करीत आहे आणि त्याने या सामन्यातही चांगली कामगिरी बजावली होती. हा कर्णधाराचा निर्णय आहे की त्याला कोणत्या क्रमांकावर खेळायचे आहे. त्याने तिसर्‍या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे आणि मला वाटते की तो त्याच क्रमांकावर खेळेल. ‘

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये शुक्रवारी(17 जानेवारी) खेळण्यात येणार आहे.

 

You might also like