पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत ‘दिग्विजय प्रतिष्ठानने’ पटकाविला चषक

पुणे । पुणे महानगरपालिका आणि स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत ५ सुवर्ण, १ रौप्य, ३ ब्रॉंझ पदके मिळवित पुण्याच्या दिग्विजय प्रतिष्ठानने पुणे महापौर चषक पटकाविला. प्रतिष्ठानच्याच श्रद्धा वानवे हिला उत्कृष्ट अश्वारोहकाचे पारितोषिक देण्यात आले.

दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मयुरी शिंदे, जयप्रकाश दुबळे, सुहास पुरी, कर्नल सरप्रतापसिंग (निवृत्त), कर्नल संजय बोरसे (निवृत्त), कर्नल बल्लेवार (निवृत्त), संयोजक गुणेश पुरंदरे, विनायक हळबे, नरेंद्र पाटील, प्रदीप कुरुलकर, सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

दिग्विजय प्रतिष्ठानने एकूण ९ पदके मिळविली. त्यापाठोपाठ द ग्रीनफिंगर्स स्कूल अकलूजच्या खेळाडूंनी २ सुवर्ण, ५ रौप्य, ३ ब्रॉंझ पदकांसह एकूण १० पदकांची कमाई केली. तर, आर्यन्स वर्ल्ड स्कूलने २ सुवर्ण, २ ब्रॉंझ अशी ४ पदके मिळवित स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. अश्वारोहणातील ड्रसाज, शो-जंपिंग आणि जिमखाना इव्हेंटस् अशा तीन प्रकारांत ही स्पर्धा झाली. मात्र, पदकसंख्या ड्रसाज व शो-जंपिंग या खेळांमधील ग्राह्य धरण्यात आली.

विजेत्या संघाला पुणे महापौर चषक प्रदान करण्यात आला. तर ड्रसाज, शो-जंपिंग प्रकारातील विजेत्यांना रोख १ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेकरीता राज्यातील विविध भागांतून स्पर्धक आले असल्याने अश्वारोहणातील कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. अकलूज, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, मुंबई आणि पुणे अशा विविध भागांतून ९ संघातील १६० खेळाडू सहभागी झाले होते.

शो-जंपिंग टॉप स्कोअर प्रकारात ज्युनियर गटात सोहम फडे (७५० गुण) प्रथम, अनिकेत हलभावी (५२० गुण) द्वितीय आणि प्रकाश ढोणे, शुभम बिरासदार (४६० गुण) तृतीय क्रमांक मिळविला. जिलेबी रेस प्रकारात ज्युनियर गटात अजिंक्य शिंदे (प्रथम), महिपाल सिंग (द्वितीय), राज हिंदोळे (तृतीय) यांनी पदकांची कमाई केली. ब्लाईंड सॅडल फिटिंग प्रकारात ज्युनियर गटात मेघना चव्हाण हिने सुवर्ण, शुभम बिरासदार याने रौप्य तर संस्कृती क्षीरसागर हिने ब्रॉंझपदक मिळविले.

इतर निकाल

जिलेबी रेस। वयोगट १० ते १२ वर्षे – सिद्धी टाकळकर (प्रथम), कार्तिक धनावडे (द्वितीय), राजकुंवर मोहिते (तृतीय), वयोगट १२ ते १८ वर्षे – रणवीर कासट (प्रथम), संस्कार हिंदोळे (द्वितीय), पृथ्वीराज देशमुख (तृतीय).

ब्लाईंड सॅडल फिटिंग। वयोगट १० ते १२ वर्षे – श्रद्धा वानवे (प्रथम), कार्तिक धनावडे (द्वितीय), अथर्व शिंदे (तृतीय), वयोगट १२ ते १८ वर्षे – लक्ष पवार (प्रथम), रणवीर कासट (द्वितीय), अलिशा मोरे (तृतीय).

You might also like