सोमवार रोजी (२० सप्टेंबर) अबु धाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (केकेआर वि. आरसीबी) यांच्यात रोमांचक सामना झाला. केकेआरच्या खेळाडूंनी फलंदाजी अन् गोलंदाजीत शानदार प्रदर्शन करत आरसीबी संघाची दमछाक केली. अवघ्या १० षटकांत ९ विकेट्सने हा सामना जिंकत त्यांनी दुसऱ्या टप्प्याची अविस्मरणीय सुरुवात केली. या सामन्यादरम्यान यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने एक खास विक्रम केला आहे.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीच्या डावादरम्यान कार्तिकने केकेआरकडून यष्टीमागे उपयुक्त कामगिरी केली. त्याने २२ धावांवर खेळत असलेल्या सलामीवीर देवदत्त पडीक्कलला लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर झेलबाद केले. या झेलसह त्याने सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांपैकी एक असलेल्या एमएस धोनी याच्या यष्टीमागे सर्वाधिक झेल घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
तो आयपीएलमधील तब्बल ११४ झेलसह या विक्रमांत धोनीसह संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. या २ अनुभवी यष्टीरक्षकांशिवाय इतर कोणताही यष्टीरक्षक आयपीएलमध्ये यष्टीमागे १०० झेलही पकडू शकलेला नाही.
भलेही कार्तिकने यष्टीमागे सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रमात धोनीची बरोबरी केली आहे. पण सर्वाधिक विकेट्सच्या कामगिरीत तो अद्यापही धोनीपेक्षा मागे आहे. धोनीने आतापर्यंत २१२ आयपीएल सामने खेळताना एकूण १५३ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या यष्टीमागील ११४ झेल आणि ३९ यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे. तर कार्तिक १४५ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ११४ झेल आणि ३१ यष्टीचीत विकेट्स घेतल्या आहेत.
केकेआरपुढे आरसीबी नतमस्तक
दरम्यान केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाचे प्रदर्शन अतिशय निराशादायी राहिले. प्रथम फलंदाजीस आलेल्या या संघाकडून सलामीवीर पडीक्कलने सर्वाधिक २२ केल्या. इतर फलंदाजांना साध्या २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. परिणामी आरसीबी संघ १९ षटकातच ९२ धावांवर सर्वबाद झाला.
त्यांच्या ९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या सलामीवीरांनी ८२ धावांची भक्कम सलामी भागिदारी रचली. शुबमन गिलच्या आक्रमक ४८ धावा आणि वेंकटेश अय्यरच्या नाबाद ४१ धावांमुळे केकेआरने केवळ १० षटकात हा सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
वैर फक्त मैदानात! आरसीबीला चोप दिल्यानंतर अय्यरने ‘रनमशीन’ कोहलीकडून घेतले फलंदाजीचे धडे- VIDEO