नवी दिल्ली | निदाहास करकंड 2018 चे आयोजन श्रीलंकेत करण्यात आले होते. या स्पर्धेत फक्त तीन देशांच्या संघांचा सहभाग होता. यात श्रीलंका, बांगलादेश आणि भारत या तीन संघ होते. बांगलादेश आणि भारत यांच्यात अंतिम लढत झाली होती. या अंतिम सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक फलंदाजीला आला होता, तेव्हा भारताने 133 धावात पाच गडी गमावले होते; आणि शेवटच्या दोन षटकांत जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता होती. भारतीय संघावर याचे दडपण होते. तथापि, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने नाबाद 22 धावा फाटकावून संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला होता.
रोहितने सहाव्या क्रमांकावर जाण्यास सांगितले
विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. त्यावेळी कार्तिकने एक्सट्रा कव्हरवरून षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. त्यावेळी सलामीवीर रोहित शर्मा हा विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा कर्णधार होता आणि त्याने अष्टपैलू विजय शंकरला दिनेश कार्तिकच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले होते. याबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला की “आधी मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज होतो, पण रोहित शर्माने मला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले. त्याचा निर्णय मी मान्य केला आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलो.”
रोहितच्या निर्णयामुळे झालो होतो निराश
पुढे बोलताना कार्तिक म्हणाला, ” मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल याचा मला पूर्ण विश्वास होता. अशा परिस्थितीत उर्वरित चेंडू आणि धावा यांच्यात खूप फरक होता. त्यामुळे चार गडी बाद झाल्यावर मी फलंदाजी करायला तयार होतो, पण त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की विजय शंकर फलंदाजीला जाईल. रोहितच्या निर्णयामुळे मी खूप निराश झालो होतो आणि मला राग आला होता. तुम्ही कर्णधाराला प्रश्न विचारू शकत नाही पण रोहितच्या मनात नक्कीच काहीतरी सुरु होतं. अखेर मी फलंदाजीसाठी सहाव्या क्रमांकावर उतरलो.”
आधीच केला होता सराव
“जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा तुम्ही काही खास कामगिरी करता. माझ्यासाठी ही एक संधी होती जिथे माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हते. मोकळेपणाने खेळण्याची माझ्याकडे संधी होती. एका षटकात 12 धावा किंवा दोन षटकांत 20 धावांची गरज असणाऱ्या कठीण परिस्थितीचा सराव मी आधीच केला होता. संघाला दोन षटकांत 34 धावांची गरज होती. ती खूप कठीण परिस्थिती होती. मी मैदानावर पाऊल टाकले तेव्हा मला माहित होते की मी मोठे फटके खेळू शकतो.” असेही पुढे बोलताना कार्तिकने सांगितले.
वाचा –
-…आणि त्या षटकाराने दिनेश कार्तिक हिट झाला!
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
-शेवटच्या चेंडूवर कमी लोकप्रिय खेळाडूंनी षटकार मारुन जिंकून दिलेले सामने