विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा बुधवारी (२३ जून) निकाल लागला. दोन वर्षे चालत आलेल्या या स्पर्धेत न्यूझीलंड संघाने बाजी मारली. ८ विकेट्सने भारतीय संघाला पराभवाचे तोंड दाखवत न्यूझीलंड संघ कसोटी क्रिकेटचा किंग झाला. उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीसोबत त्यांनी क्षेत्रऱक्षणातसुद्धा चांगला नमुना दाखविला. दुसरीकडे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा उपविजेता ठरलेल्या भारतीय संघात क्रिकेट जाणकारांना अजून एका वेगवान गोलंदाजाची कमी भासली. याबद्दल स्वत: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने भाष्य केले आहे.
सामना संपल्यानंतर विराट कोहलीने सांगितले की, “सर्वप्रथम न्यूझीलंड संघाला त्यांच्या विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा. न्यूझीलंड संघाने त्यांचा सर्वोत्तम खेळ खेळला. ज्यामध्ये त्यांनी ३ दिवसातच सामना जिंकला. त्यांनी आम्हाला प्रत्येक क्षणाला दबावात ठेवले. दुसऱ्या दिवशी खेळणे जरा कठीण गेले. परंतु, आम्ही पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली होती. पण आज (बुधवार) सकाळच्या सत्रात त्यांच्या गोलंदाजांनी आपले काम अतिशय चोखपणे पार पाडले. त्यांनी आम्हाला धावा करण्याची संधीच दिली नाही आणि आम्ही ३०-४० धावा करण्यात कमी पडलो.”
सामन्याचा एक दिवसअगोदरच प्लेईंग इलेव्हन घोषित केल्यामुळे कोहलीला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने सांगितले की, “मला आम्ही निवडलेल्या प्लेईंग इलेव्हनबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. कारण संघाला अष्टपैलू खेळाडूंची गरज असते. आम्ही सर्वांनी एकमत होऊनच प्लेईंग इलेव्हनची निवड केली होती.”
याबरोबरच कोहलीने आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचेही (आयसीसी) कौतुक केले. आयसीसीने कसोटी क्रिकेटला वाव मिळण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आयोजली यामुळे त्याने आयसीसीच्या निर्णयाची स्तुती केली आहे. त्याने सांगितले की, “या स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचे महत्व अजूनच वाढेल आणि क्रिकेटचा हाच प्रकार सर्वात उत्तम आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘विलियम्सन आणि कंपनी’ची कसोटी जेतेपदावर मोहोर, चॅम्पियन कर्णधाराने दिली पहिली प्रतिक्रिया
ऐतिहासिक लढतीचे नायक! आयसीसीच्या पहिल्यावहिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘हे’ ठरलेत सामनावीर
न्यूझीलंडविरुद्धचा पराभव कॅप्टन कोहलीसाठी दुर्दैवी, अंतिम सामन्यात पोहोचून ‘इतक्यांदा’ गमावलाय चषक