पुणे- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत धनराज शिंदे(नाबाद ४४)धावांच्या खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ९ गडी राखून पराभव करत विजयी घौडदौड रोखली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आज दोन्ही संघात प्रत्येकी ५ षटकांचा सामना खेळविण्यातआला. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या रत्नागिरी जेट्स संघाची विजयी मालिका ईगल नाशिक टायटन्स संघाने रोखत तिसरा विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्स संघाने ५षटकात २बाद ८३धावा केल्या. यात धीरज फटांगरे २३, निखिल नाईक नाबाद २४, प्रीतम पाटील २१ धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.
हे आव्हान ईगल नाशिक टायटन्स संघाने अवघ्या ४षटकात १बाद ८५धावा करून पूर्ण केले. धनराज शिंदेने १३चेंडूत नाबाद ४४धावांची तुफानी खेळी केली. त्यात त्याने १चौकार व ६षटकारांची आतषबाजी केली. त्याला मंदार भंडारीने १३चेंडूत २चौकार व ३ षटकारासह नाबाद २९ धावा काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १९चेंडूत ८० धावांची आक्रमक भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
निकाल: साखळी फेरी:
रत्नागिरी जेट्स: ५षटकात २बाद ८३धावा(धीरज फटांगरे २३, निखिल नाईक नाबाद २४(९,२x४,१x६), प्रीतम पाटील २१, हरी सावंत १-१८) पराभुत वि.ईगल नाशिक टायटन्स: ४षटकात १बाद ८५धावा(धनराज शिंदे नाबाद ४४(१३,१x४,६x६), मंदार भंडारी नाबाद २९(१३,२x४,३x६), दिव्यांग हिंगणेकर १-३६);सामनावीर – धनराज शिंदे; ईगल नाशिक टायटन्स संघ ९ गडी राखून विजयी.