भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ४ ऑगस्टपासून भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळायचा आहे. या सराव सामन्यासाठी काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात १४ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
हा सराव सामना २० ते २२ जुलै दरम्यान डरहॅमच्या एमिरेट्स रिव्हरसाईड मैदानावर होईल. या सामन्यासाठी काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी वार्विकशायरच्या विल ऱ्होड्सकडे सोपवण्यात आली आहे. तसेच या संघात जेम्स बार्सीलाही संधी देण्यात आली आहे. त्याने मागील महिन्यातच कसोटी पदार्पण केले आहे. तसेच २०१६ साली भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या हसीब हमीदला देखील या संघात संधी मिळाली आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून रिचर्ड डावसन यांची निवड झाली आहे.
या संघात प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या विविध काउंटी संघांतील खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘या संघाची निवड प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या काउंटी संघांशी खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल सल्लामसलत केल्यानंतर करण्यात आली आहे. तसेच काउंटी सामन्यांतून मिळालेल्या काही उच्च प्रतिभेच्या खेळाडूंचा यात समावेश आहे. या खेळाडूंना आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळलेल्या संघाविरुद्ध स्वत:ला तपासण्याची संधी मिळेल.’
तसेच हा सराव सामना खेळण्यापूर्वी सर्व खेळाडूंना कोरोना चाचणी करुन घ्यावी लागणार आहे. या सामन्यासाठी ते एका लहान बायोबबलमध्ये असतील.
या सामन्याला २० जुलैपासून स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरुवात होणार आहे. तसेच प्रत्येक दिवशी प्रत्येकी ९० षटकांचा खेळ होणार आहे. या सराव सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण डरहॅम क्रिकेटच्या युट्यूब चॅनेलवर होणार आहे.
या सामन्यासाठी भारताचे रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा हे खेळाडू उपलब्ध नसतील. पंत सध्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने क्वारंटाईन आहे. तसेच भारताचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सहासह अभिमन्यू ईश्वरन आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनाही १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.
भारताविरुद्धच्या सराव सामन्यासाठी काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघ
विल रोड्स (वार्विकशायर – कर्णधार), रेहान अहमद (लीसेस्टरशायर), टॉम अस्पिनवेल (लँकाशायर), इथन बाम्बर (मिडलसेक्स), जेम्स ब्रेसी (ग्लुस्टरशायर), जॅक कार्सन (ससेक्स), झॅक चॅपल (नॉटिंघमशायर), हसीब हमीद (नॉटिंघमशायर) लिंडन जेम्स (नॉटिंघमशायर), जेक लिबी (वॉर्स्टरशायर), क्रेग माईल्स (वार्विकशायर), लियाम पॅटरसन-व्हाइट (नॉटिंघमशायर), जेम्स रे (सॉमरसेट), रॉब येट्स (वार्विकशायर).
असे आहे इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
असा आहे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला
महत्त्वाच्या बातम्या –
‘कुल-चा’ जोडी एकत्र म्हणजे मजामस्तीची खात्री! विराट, धोनीची नक्कल करतानाचा व्हिडिओ व्हायरल