इंग्लंड व भारत यांच्यातील पाचवी कसोटी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. भारतीय संघ ही कसोटी न खेळता आयपीएल खेळण्यासाठी परतला आहे. मात्र, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) याबाबत पत्रही लिहिले आहे, असे सांगितले जातेय. भारतीय संघातील कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह नव्हता, यानंतरही भारतीय संघाने सामना खेळला नाही. आता क्रिकेटचे संचालन करणारी सर्वोच्च संस्था आयसीसीला ठरवायचे आहे की, पाचवी कसोटी रद्द करावी की इंग्लंडला विजेता घोषित करावे. सध्या भारत मालिकेत २-१ ने पुढे आहे.
ईसीबी झुकली
ऑस्ट्रेलियातील प्रमुख वृत्तपत्राच्या बातमीनुसार, ईसीबी आयसीसीला लिहिलेले पत्र मागे घेऊन थेट बीसीसीआयशी या विषयावर बोलू शकते. भारतीय संघाला पुढील वर्षी इंग्लंडमध्ये तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने दोन अतिरिक्त टी२० सामने खेळण्याची ऑफर ईसीबीला दिल्याचे सांगितले जातेय. मात्र, बीसीसीआयने हे स्पष्ट केले आहे की, अंतिम कसोटी सामना अद्यापही रद्द केला गेला नाही.
दोन्ही बोर्डात वाढला वाद
मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर बीसीसीआय आणि ईसीबीमधील वाद वाढला. ईसीबीने खेळाडूंना आयपीएल प्लेऑफमध्ये खेळण्यास बंदी घातली असून, त्यांना पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेत खेळाचे आदेश दिले आहेत. मात्र, आता चेंडू आयसीसीच्या कोर्टात आहे की ते काय निर्णय घेतात. मालिका किती सामन्यांची हे ठरवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत गुण दिले जातील.
ईसीबीला दुहेरी धक्का
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. अशा परिस्थितीत, जर कोविड-१९ मुळे अंतिम कसोटी रद्द झाली असे आयसीसीला वाटत असेल, तर ईसीबीला विम्याचे पैसे मिळणार नाहीत. कारण, कोरोनाचा यात समावेश नाही. अशा परिस्थितीत, ईसीबीला सुमारे ५५० कोटी रुपयांचे नुकसान होईल. परंतु, जर २०२०-२०२४ च्या प्रसारण कराराअंतर्गत अतिरिक्त कसोटी खेळली गेली तर, हे नुकसान १०० कोटी रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.