पुणे। भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांच्या सहकार्याने भारतीय रोलबॉल संघटना आणि महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्या वतीने २ व ३ फेब्रुवारी दरम्यान ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन महेश विद्यालय, डीपी रोड, कोथरूड येथे करण्यात आले असून या स्पर्धेत विविध राज्यातील रोलबॉल संघ सहभागी होणार आहेत.
या संघांमध्ये खेळाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि संघभावना निर्माण करण्यासाठी दोन राज्यांचा मिळून एक संघ तयार करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे यांनी दिली.
स्पर्धेतील लढती सकाळी ८ ते १ व दुपारी ३ ते ९ यावेळेत होणार आहेत. ही स्पर्धा लीग व नॉकआउट पद्धतीने घेण्यात येणार असून या स्पर्धेत राजस्थान-आसाम, गोवा-झारखंड, उत्तराखंड-कर्नाटक, दिल्ली-सिक्कीम, उत्तर प्रदेश-अरुणाचल प्रदेश-मेघालय, बिहार-त्रिपुरा-मिझोरम, मध्य प्रदेश-मणिपूर-नागालँड, महाराष्ट्र-ओडिसा, पंजाब-आंध्र प्रदेश, गुजरात-छत्तीसगड, हरियाणा-तेलंगणा, जम्मू-काश्मीर-तामिळनाडू, हिमाचल प्रदेश-केरळ, पॉंडिचेरी-दमण-द्वीप असे १४ संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष विनीत कुबेर यांनी दिली.