ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ हा सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडसोबत टी20 आणि वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा दौरा केला आहे. टी20 मालिका इंग्लंडने जिंकली तर नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ने विजय मिळविला. काल या वनडे मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना मँचेस्टर येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो याने उत्कृष्ट फलंदाजी केली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्याच्या पहिल्या 2 चेंडूत मिशेल स्टार्कने 2 बळी मिळवले. त्यानंतर जॉनी बेयरस्टो खेळपट्टीवर खेळत राहिला आणि 126 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांसह 112 धावा ठोकल्या.
एकेवेळी इंग्लंडच्या संघाची स्थिती 4 बाद 90 धावा अशी होती. अशा परिस्थितीत जॉनी बेयरस्टोने फलंदाज सॅम बिलिंग्जसोबत (58 चेंडू 56 धावा) 5 व्या गाड्यासाठी 114 धावांची भागीदारी केली. त्याच्या वनडे कारकिर्दीतील हे दहावे शतक होते. एवढेच नव्हे तर 10 वनडे शतकांसाठी सर्वात कमी डाव खेळणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने 76 डावात ही कामगिरी करुन शिखर धवनला मागे टाकले आहे. शिखर हा विक्रम करण्यासाठी 77 डाव खेळला होता.
सर्वात वेगवान 10 वनडे शतक झळकावणारे फलंदाज:
क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – 55 डाव
हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) – 57 डाव
बाबर आझम (पाकिस्तान) – 68 डाव
जॉनी बेअरस्टो (इंग्लंड) – 76 डाव
शिखर धवन (भारत) – 77 डाव
याव्यतिरिक्त, बेयरस्टोचे नाव पुन्हा एका विशेष यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. किंबहुना इंग्लंडकडून 10 किंवा अधिक शतकं ठोकणारा तो फक्त चौथा फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडकडून सर्वाधिक वनडे शतक ठोकणारे फलंदाज:
जो रूट – 16 शतक
इऑन मॉर्गन – 13 शतक
मायकेल ट्रेस्कोथिक – 12 शतक
जॉनी बेयरस्टो – 10 शतक