इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात पहिला वनडे सामना झाला. छोटे लक्ष्य मिळालेल्या या सामन्यात भारताने १० विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावा केल्या आहेत. त्याच्या बरोबरीने शिखर धवनने नाबाद ३१ धावा केल्या आहेत. या सामन्यात रोहितने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
कारकिर्दीतील २३१वा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याने १४५ डावांमध्ये सलामीला येत ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने ६० डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटच्या सर्वाधिक डावामध्ये ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला (Hashim Amla) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांचा क्रमांक लागतो. आमलाने ५६ डावांमध्ये तर धवनने ५२ डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित-शिखर जोडीने पहिल्या विकेटसाठी नाबाद ११४ धावांची भागीदारी केली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी ५००० पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचणाऱ्या जोडींमध्ये रोहित-शिखर ही चौथी जोडी ठरली आहे. भारताकडून फक्त सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर (Sourav Ganguly-Sachin Tendulkar) जोडीने हा पराक्रम केला आहे. त्यांनी १३६ डावांमध्ये ६६०९ धावा केल्या, तर रोहित-शिखर यांनी आतापर्यंत ११२ डावांमध्ये ५१०८ धावा केल्या आहेत. त्यांनी २०१८च्या एशिया कपमध्ये पहिल्या विकेट्ससाठी २१० धावांची भागीदारी केली होती. ही त्यांची वनडेतील सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.
वनडेमध्ये सलामीवीर म्हणून पहिल्या १४५ डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज-
६० – रोहित शर्मा*
५६ – हाशिम आमला
५२ – शिखर धवन
५१ – सचिन तेंडुलकर
५१ – सौरव गांगुली
ओव्हलवर झालेल्या या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केले आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने तर त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने ७.२ षटकांमधील ३ षटके निर्धाव टाकली असून एकूण १९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा वनडे सामना लॉर्ड्सवर १४ जुलैला खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतानं इंग्लंडला हरवलं अन् दादाने टी-शर्ट काढला, सोबतच्या खेळाडूलाही दिला होता सल्ला