शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) मँचेस्टरच्या द ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रंगणार होता. परंतु सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी चाहत्यांचे हृद्य तोडणारी बातमी पुढे आली. भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे यजमानांनी हा सामना रद्द करण्याचे ठरवले. असे असले तरीही, हा सामना पुनर्निर्धारित होण्याची (रिशेड्यूल) शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यासंबंधी पुष्टी केली आहे.
बीसीसीआय आणि इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यातील संबंध सलोख्याचे आहेत. त्यामुळे बीसीसीआयने ईसीबीकडे हा रद्द कसोटी सामना पुन्हा आयोजण्याची विनंती केली. यावर ईसीबीने होकार दिला असून दोन्ही बोर्ड या सामन्याला पुन्हा आयोजण्यासाठी एक विंडो शोधण्याचे काम करत आहेत.
बीसीसीआयने यासंबंधी माहिती देताना लिहिले की, ‘बीसीसीआय आणि ईसीबी संयुक्तपणे भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील मँचेस्टरवर होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बोर्डांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहेत. भारतीय संघातील वाढता कोरोनाचा प्रकोप पाहता ओल्ड ट्रॅफर्डवरील हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यास मजबूर व्हावे लागले आहे.’
‘असे असले तरीही, बीसीसीआयने ईसीबीकडे हा सामना पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली आहे. दोन्ही बोर्ड या सामन्यासाठी अवधी शोधण्यावर काम करतील,’ असे बीसीसीआयने पुढे लिहिले आहे. यासोबतच बीसीसीआयने ईसीबीच्या सहकार्यासाठी त्यांचे आभारही मानले आहेत.
परंतु हा सामना कधी आणि कोठे होईल?, हे पाहावे लागेल. भारतीय संघ पुढच्या वर्षी अर्थातच २०२२ मध्ये ३ सामन्यांची टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला येणार आहे. अशात यावेळी या रद्द झालेल्या पाचव्या कसोटी सामन्याचे आयोजन केले जाऊ शकते. हा सामना रद्द होण्यापूर्वी भारतीय संघ २-१ ने मालिकेत आघाडीवर होता. अशात सामना पुनर्निर्धारित केल्यास खेळाडूंसह चाहत्यांनाही अंतिम निकालाची प्रतिक्षा करावी लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
चार वर्षांनंतर अश्विनचे टी२०त पुनरागमन; कर्णधार, प्रशिक्षक किंवा निवडकर्ते नव्हे ‘या’ शिलेदाराचा हात
धोनीपुढे मोठा पेच, टी२० विश्वचषकात भारताचा मार्गदर्शक बनण्यासाठी सोडावी लागणार सीएसकेची साथ!