इंग्लंड संघाने बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेत विजयाचं तोंड पाहिलं. त्याआधी इंग्लंडला सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या स्पर्धेच्या 40व्या सामन्यात इंग्लंडने नेदरलँड्स संघाला 160 धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा इंग्लंडचा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. या विजयानंतर कर्णधार जोस बटलर याने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, अखेर आम्ही एक चांगले प्रदर्शन केले.
काय म्हणाला बटलर?
गतविजेत्या इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने विजयानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “अखेर आम्ही एक चांगले प्रदर्शन केले. मलानने आम्हाला चांगली सुरुवात दिली, पण स्टोक्स आणि वोक्सची भागीदारी शानदार होती. जेव्हाही गरज असते, तेव्हा तो असा आहे की, संघासाठी नेहमी उपलब्ध असतो. ही खूपच चांगली खेळपट्टी होती, आम्ही चांगली धावसंख्याही बनवली, त्यामुळे आम्ही समाधानी होतो. नाणेफेक अशी गोष्ट असते की, तुम्ही जुना काळ पाहिला तर वाटते, आम्ही असे केले असते, तर चांगले झाले असते. मात्र, हा विश्वचषक आहे, इथे दबाव असतो.”
इंग्लंडचा दणदणीत विजय
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. संघाने प्रथम फलंदाजी कराना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 339 धावा केल्या. इंग्लंडला हे आव्हान मिळवून देण्यात बेन स्टोक्स (108) आणि ख्रिस वोक्स (51) यांचे मोलाचे योगदान होते. तसेच, नेदरलँड्स संघाने 37.2 षटकात सर्व विकेट्स गमावत 179 धावा केल्या. नेदरलँड्सकडून तेजा निदामानुरुने 34 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 41 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना मोईन अली आणि आदिल रशीद चमकले. दोघांनीही प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच, डेविड विलीने 2, तर ख्रिस वोक्सने 1 विकेट घेतली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आशा कायम
खरं तर, हा सामना इंग्लंडसाठी खूपच महत्त्वाचा होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे होते. या विजयासह इंग्लंडच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आशा कायम आहेत. ते पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी पोहोचले आहेत. तसेच, नेदरलँड्स संघ पॉईंट्स टेबलमध्ये 10व्या स्थानी घसरला आहे. (eng vs ned captain jos buttler statement after win match against netherlands world cup 2023)
हेही वाचा-
शमीवर जडला ‘या’ अभिनेत्रीचा जीव, खुल्लमखुल्ला केले लग्नासाठी प्रपोज, ठेवलीय फक्त एक अट; जाणून घ्याच
अरे व्वा! भारताच्या ‘या’ 2 शहरांमध्ये होऊ शकते WPL 2024चे आयोजन, तुमच्या तर शहरात नाही? वाचा लगेच