भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सध्या हैदराबादमध्ये खेळला जात आहे. गुरुवारी (25 जानेवारी) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघ 64.3 षटकात 246 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एका विकेटच्या नुकसानावर 119 धावा केल्या. इंग्लंड संघ सध्या 127 धावांनी आघाडीवर आहे.
भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम गोलंदाजी करावी लागली. इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय भारतीय गोलंदाजांनी जवळजवळ चुकीचा ठरवला. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेत पहिला दिवस आपल्या नावावर केला. यासाठी जडेजाने 18 षटकात 88 धावा खर्च केल्या, तर अश्विनने 21 षटकात 68 धावा खर्च केल्या. अक्षर पटेल याने 13 षटकांमध्ये 33 धावा कर्च करून 2 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानेही 8.3 षटकात 28 धावा खर्च करून दोन विकेट्स नावावर केल्या. मोहम्मद सिराज मात्र पहिल्या डावात एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने 4 षटके गोलंदाजी केली आणि 28 धावा खर्च केल्या.
इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर झॅक क्रॉली (20) आणि बेन डकेत (35) यांनी 55 धावांची भागीदारी केली होती. पण 12व्या षटकात अश्विनने डकेतच्या रुपात भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर 16व्या षटाकापर्यंत ओली पोप (1) आणि झॅक क्रॉली यांनीही विकेट्स गमावल्या. त्यावेळी संघाची धावसंख्या तीन बाद 60 धावा होती. जो रुट वैयक्तिक 29, तर जॉनी बेअरस्टो 37 धावा करून बाद झाले. बेन स्टोक्स याने 88 चेंडूत सर्वाधिक 70 धावाकेल्या. बेन फोक्स 4, रेहान अहमद 13, टॉम हार्टली 23 धावा करून बाद झाले. मार्क वुड याने 11 धावांवर विकेट गमावली, तर जॅक लीज एकही धाव न करता नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. दिवसाखेर जयस्वाल 76* धावांसर खेळपट्टीवर कायम आहे. पण रोहित 27 चेंडूत 24 धावा करून तंबूत परतला. शुबमन गिल याने 43 चेंडूत 13* धावा केल्या. दुसऱ्या दिवशी गिल आणि जयस्वाल भारतासाठी डावाची सुरुवात करतील. इंग्लंडसाठी पहिल्या दिवसाखेर जॅक लीच याने 9 षटकात 24 धावा खर्च केल्या असून रोहितची विकेट घेतली. मार्क वुड टॉम हार्टली आणि रेहान अहमद यांना पहिल्या दिवशी विकेट घेता आली नाही. (England are leading by 127 runs on the first day of the Hyderabad Test)
महत्वाच्या बातम्या –
लाईव्ह सामन्यात घुसला विराटचा चाहता, घेतला रोहित शर्माचा आशिर्वाद, पाहा VIDEO
IND vs ENG: संघात रोहित-बुमराह असतानाही स्टेडियमवर फक्त कोहलीच्या नावाचा जयघोष, पाहा व्हिडीओ