आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होईल. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कितपत उपलब्ध असणार, याचे उत्तर स्वतः इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकाने दिले आहे.
या तारखेपर्यंत उपलब्ध असणार इंग्लंडचे खेळाडू
आयपीएलमध्ये इंग्लंडचे अनेक मातब्बर खेळाडू सहभागी होत असतात. इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यांच्यावर मोठमोठी बोली देखील लावली जाते. यावर्षी, आयपीएलच्या अंतिम फेरीनंतर अवघ्या दोनच दिवसात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लॉर्डसवर कसोटी सामना रंगणार आहे. त्यामुळे, इंग्लंडचे खेळाडू स्पर्धेचा अंतिम टप्पा खेळणार का? यावर साशंकता निर्माण झाली होती.
इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी या मुद्द्यावर बोलताना म्हटले आहे की, “आम्ही कसोटी सामन्याविषयी जास्त विचार केला नाही. काही युवा खेळाडूंना संधी द्यायची झाल्यास, अनुभवी खेळाडू पूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध असतील. आम्ही भविष्याविषयी योजना तयार करणार आहोत. मात्र, अजून त्याविषयी काही चर्चा झाली नाही.”
सध्या इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर असून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. १२ मार्चपासून उभय संघांमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका अहमदाबाद येथे सुरू होईल.
या संघांना होणार फायदा
इंग्लंडचे खेळाडू पूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध असल्यास सर्वाधिक फायदा राजस्थान रॉयल्स संघाला होईल. कारण, जोस बटलर, बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर हे राजस्थानचे प्रमुख खेळाडू आहेत. तसेच, चेन्नई सुपर किंग्स संघाचा मोईन अली व दिल्ली कॅपिटल्सचा ख्रिस वोक्स हे इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रमुख खेळाडू या पूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध राहू शकतात.
असे होणार आयपीएलचे आयोजन
या वर्षी आयपीएलचे आयोजन ९ एप्रिल ते ३० मे यादरम्यान भारतातील विविध सहा शहरांमध्ये केले जाईल. अहमदाबाद येथे प्लेऑफचे सामने खेळविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही. आयपीएलचा हा हंगामसुद्धा विनाप्रेक्षक खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
अगग, लग्नाआधीच जावई प्रेम जगजाहीर! शाहिद-शाहीनचा तो व्हिडिओ भन्नाट व्हायरल, लोक घेतायत मजा
इंग्लंडला पराभवानंतर अजून एक धक्का, हा प्रमुख गोलंदाज टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता